नागपूर : २०१४ मध्ये घोषित, २०१९ मध्ये पूर्ण होणार म्हणून केलेला संकल्प आणि प्रत्यत्क्षात २०२५ मध्ये पूर्ण झालेला नागपूर – मुंबई (प्रत्यक्षात ठाणे) समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरसह अन्य सहा जिल्ह्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे.
७०१ किलोमीटर अंतराच्या या महामार्गामुळे नागपूर – मुंबई हे अंतर आठ तासात कापणे शक्य झाल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात येत आहे. नागपूर ते शिर्डी या ५०० किलोमीटर अंतराचे उद्घाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये झाले. महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे झाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महामार्गाची अखे्र पूर्तता झाली.
नागपूरहून सुरू होणारा हा महामार्ग विदर्भातील नागपूर, वर्धा,अमरावती,वाशीम,अकोला आणि बुलढाणा जिल्हयांतून जातो. चंद्रपूर आणि गडचिरोली हे राज्याच्या एका भागाला असणाऱ्या जिल्ह्यांना समृद्धीशी जोडण्यासाठी नागपूर ते चंद्रपूर आणि नागपूर ते गडचिरोली असे नवे महामार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे.
नागपूरवरून समृद्धीवर जायचे असेल तर शिवमडका ये्थे एन्ट्री पॉईन्ट आहे. नागपूरनंतर येणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना या महामार्गावर यायचे असेल तर त्यासाठी येळाकेळी (जि. वर्धा) येथून रस्ता आहे. अमरावती जिल्ह्यातीन नागरिकांना,वाहनधारकांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथे ए्ट्री पॉईन्ट आहे. वाशीम जिल्ह्यासाठी कारंजा लाड (जिल्हा वाशिम) येथून जोड मार्ग देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातून बोरगाव मंजू येथून तर विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातून मेहकर येथून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी एन्ट्री पॉईन्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सिंदी रेल्वे येथे ड्रायपोर्ट तयार करण्यात आला आहे. त्यालाही समृद्धी महामार्गाशी जोडण्यात आले आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहर आहे. येथे मालवाहतुकीसाटी रेल्वे आणि विमानासह आता समृद्धी महामार्ग हा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. विदर्भातील शेतमाल किंवा अन्य वस्तू मुंबईतील पोर्टवर पाठवण्यासाठी वेगवान मार्ग समृद्धीच्या माध्यमातून उपलब्ध झाला असून पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांना या महामार्गाशी जोडण्यात आले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर येथूनच हा महामार्ग सुरू होत आअसला तरी राज्याचा शेवटचा भाग असलेल्या गडचिरोलीला, चंद्रपूर जिल्ह्यांना या महामार्गाला जोडण्यासाठी स्वतंत्र महामार्ग तयार करण्यात आला आहे.
सलग्न मार्ग
नागपूर – शिवमडका (जिल्हा-. हिंगणा)
वर्धा – येळाकेळी (जिल्हा- वर्धा)
यवतमाळ /अमरावती -धामनगाव रेल्वे (जिल्हा अमरावती)
वाशीम – कारंजा लाड (जिल्हा वाशीम)
बुलढाणा – मेहकर (जि. बुलढाणा)
गडचिरोल चंद्रपूर – नागपूरला समृद्धीशी जोडणारा महामार्ग प्रस्तावित