नागपूर : वेसटर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या उमरेड खाण प्रकल्पात गोकुळ मुरपर उपक्षेत्रात कार्यरत वरिष्ठ पर्यवेक्षक (सिव्हिल) पवन नखाटे बुधवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ जाळ्यात सापडला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंगापूर चौकाजवळ रचलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली.

काय आहे नेमकं प्रकरण….?

पीरवा गावाच्या पुनर्वसनस्थळी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दोन कूपनलिका बांधणे, तसेच अंतर्गत मुख्य व वितरण जलवाहिनीसह सबमर्सिबल पंप बसवण्याचे कंत्राट तक्रारदाराला मिळाले होते. या कामाच्या एकूण २५ लाख ३५ हजार ६९३ रुपये मूल्याच्या तिसऱ्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी पवन नखाटे याने बिलाच्या २ टक्के म्हणजेच ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याप्रकरणी तक्रारदाराने २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

पडताळणी आणि वाटाघाटी….

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत या तक्रारीची पडताळणी केली. त्यादरम्यान नखाटे याने २२ लाख रुपयांच्या भरलेल्या रकमेचे २ टक्के (४४,००० रुपये) आणि मागील थकीत १०,००० रुपये मिळून एकूण ५४,००० रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. अखेर वाटाघाटीअंती ही रक्कम ५० हजार रुपयांवर ठरली.

तक्रारीत तथ्य आढळल्याने आरोपी पवन नखाते याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ (२०१८ ची सुधारणा) च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

गंगापूर चौकात रचवा रचला सापळा…

अधिकाऱ्यांनी उमरेड येथील गंगापूर चौकाजवळ बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सापळा रचला. आरोपी पवन नखाटे तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारत असतानाच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास यंत्रणेकडून सुरू आहे.