ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असे आपले शेजारी देश आहेत. गलवान सीमेवर दोन वर्षांपासून चीनची कुरघोडी सुरू आहे. शेजारी देशापासून आपल्या सीमाभागाला धोका असतानाही आम्ही आजही अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या शस्त्रासाठी इतर देशांवर अवलंबून असल्याकडे लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी लक्ष वेधले. कुठलाही देश शस्त्र निर्मितीचे आपले आधुनिक तंत्रज्ञान इतरांना सांगत नाही. त्यामुळे आपल्याला शस्त्र निर्मितीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>> यवतमाळात शिवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा (व्हीएनआयटी) २० वा दीक्षांत सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी चित्रफीत संदेशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘सीएसआयआर’चे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. भारताचे शेजारी अण्वस्त्रसज्ज आहेत. गेल्या दोन वर्षांत चीनसोबतच्या आपल्या उत्तरेकडील सीमेवरील घडामोडी वाढत आहेत. ज्यात गलवान येथील चकमकीचा समावेश आहे. यामुळे आधुनिक चपळ आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम, सशस्त्र दल कायम करण्याची गरज अधिक आहे.

हेही वाचा >>> नागपूर : डोक्याखाली पर्स ठेवून झोपने महिलेला भोवले ; अहमदाबाद एक्स्प्रेस चोरी

देशाचे संरक्षण आणि सुरक्षेसाठी आयात केलेल्या तंत्रज्ञानावरील अवलंबित्व ही दोषपूर्ण रणनीतीही आहे, असे जनरल पांडे म्हणाले. आजची सुरक्षा तंत्रज्ञानाच्या पराक्रमावर आधारित आहे. मात्र, आपले अद्ययावत, अत्याधुनिक तंत्रज्ञान सांगण्यास कोणताही देश इच्छुक नाही. राष्ट्राची सुरक्षा परावलंबी राहू शकत नाही किंवा इतरांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे सक्षम, शस्त्रांच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्णता अत्यावश्यक आहे. याकडे यापुढे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

आजच्या जगात विघटनकारी तंत्रज्ञानाचा उदय वेगाने होत आहे. ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘मशीन लर्निंग’, ‘नॅनो टेक्नॉलॉजी’, ‘५-जी’ या सर्व क्षेत्रांमध्ये क्रांती होत आहेत. या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील युद्धांचे स्वरूप बदलत आहे, असेही लष्करप्रमुख म्हणाले.