नागपूर : पूर्वी लग्न म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या, असे ठरलेले समीकरण होते. मात्र, कालौघात हे समीकरण बदलले असून हिवाळ्याच्या दिवसात लग्नसोहळ्यांचे प्रमाण वाढले आहे. चरेच जण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या थंडीच्या महिन्यांमध्ये लग्नाचा विचार करत असतात, परंतु, यंदा या नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये फारसे मुहूर्त नाहीत.

जानेवारीचा तर संपूर्ण महिना विवाह मुहूर्तविना आहे. त्यामुळे हिवाळ्यातील लग्नसराईचा मौसम थंड राहणार असल्याचे चित्र आहे. तुळशी विवाह संपन्न झाले असून लग्नकार्यांना सुरुवात झाली. नोव्हेंबर ते जुलै यादरम्यान साठहून अधिक विवाह मुहूर्त उपलब्ध आहेत. यातील बहुतांश मुहूर्त है उन्हाळ्यामध्ये आहेत. प्राप्त माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात सध्या १२,१३, १५,२२, २३,२५,२६,२७,३० हे विवाहास उपयुक्त दिवस आहेत.

तर डिसेंबरमध्ये २, ५ असे दोनच दिवस विवाह मुहूर्त आहे. १४ डिसेंबर ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत शुक्राचा अस्त असल्यामुळे अर्धा डिसेंबर आणि संपूर्ण जानेवारी महिना विवाह मुहूतांशिवाय आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ३, ५, ६, ७, ८, १०, ११, १२, २०, २२, २५, २६ मुहूर्त आहेत. पण, या कालावधीत परीक्षा राहत असल्याने बरेच जण मार्चपासून पुढे लग्नाला पसंती देतात.

मार्च महिन्यात ५, ७, ८, १२, १४, १५, १६ तर एप्रिलमध्ये २१, २६, २८, २९, ३० मे महिन्यात १, ३.६, ७, ८, ९, १०, १३, १४ तसेच जून महिन्यात १९, २०, २२, २३, २४, २७ आणि जुलै महिन्यात १, २, ३, ४, ७, ८, ९, ११ विवाह मुहूर्त आहेत.

दीड महिन्याचे नुकसान

१४ डिसेंबर ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत शुक्राचा अस्त असल्यामुळे अर्धा डिसेंबर आणि संपूर्ण जानेवारी महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाही. हा दीड महिन्याचा कालावधी मंगल कार्यालये, लॉन, बिछायत, डेकोरेशन, बैंड पार्टी, कॅटरिंग यांसह वेडिंग इंडस्ट्रीतील सर्व घटकांना नुकसानदायी ठरणार आहे. हिवाळ्यातील मुहूर्ताची रोडवलेली संख्या पाहता या काळात वेडिंग इंडस्ट्रीला गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा सहन करावा लागणार आहे. लग्नकार्याच्या निमित्ताने कोट्यवधींची उलाढाल होत असते.

विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लग्नकार्य राहिल्यास वेडिंग इंडस्ट्रीला चांगल्या उलाढालीची अपेक्षा असते. परंतु, यावर्षी हिवाळ्याऐवजी उन्हाळ्यात वेडिंग इंडस्ट्री अधिक खुलेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात लग्नकार्य होण्याची शक्यता असून त्याच काळात वेडिंग इंडस्ट्रीलादेखील बूस्ट मिळण्याची अपेक्षा आहे.