नागपूर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. भाजप १९३ आणि तृणमूल काँग्रेसने ९४ जागांवर आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित आहे. अशातच भाजपच्या या विजयामागची कारणे शोधली जात आहेत.
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या संघटनेची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पारंपरिकपणे थेट राजकारणापासून दूर राहणारा संघ यावेळी मात्र पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचे दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, संघाने राज्यातील जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क मोहीम राबवली. सुमारे १.७५ लाखांहून अधिक मतदान जागृती बैठका घेऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.
सूक्ष्म पातळीवरील संपर्क
संघाची रणनीती ही मोठ्या सभांपेक्षा सूक्ष्म पातळीवरील संपर्कावर आधारित होती. स्वयंसेवकांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला, तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, या मोहिमेत हिंदू मतांचे एकत्रीकरण हा मुख्य मुद्दा होता. संघाशी संबंधित विविध संस्थांनी स्थानिक पातळीवर सक्रिय भूमिका घेतली आणि निवडणूक ही केवळ राजकीय स्पर्धा नसून सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांशी जोडलेली आहे, असा संदेश देण्यात आला. याशिवाय, संघाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जसे की जिष्णु बसू यांनी संघटनात्मक पातळीवर मजबूत जाळे उभारण्यावर भर दिला. पंचायत ते शहरी भागापर्यंत संघटन विस्तारल्याने मतदारांपर्यंत पोहोच अधिक प्रभावी ठरल्याचे मानले जाते. संघाची भूमिका ही “मर्यादित पण महत्त्वाची” असल्याचे काही नेत्यांचे मत आहे. निवडणुकीतील यश हे अनेक घटकांवर अवलंबून असते, आणि संघ हा त्यातील एक घटक असल्याचेही सांगितले जाते.
डॉ. मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्तींची भेट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पाच वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींची भेट घेतली होती. बंगाल निवडणुकीच्या पूर्वी ही भेट झाली होती. मात्र, यावेळी भाजपला बंगालमध्ये फारसे यश आले नव्हते. मिथून चक्रवर्ती यांनीही यावेळी भाजपचा प्रचार केला होता. परंतु, संघाचे सततचे प्रयत्न आणि जनसंपर्कामुळे अखेर भाजपला यश मिळाले हे निश्चित.
