नागपूर: सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा उत्पादक कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि) ला राज्यातील सहा खाण क्षेत्रांत दुर्मिळ स्वरूपाच्या आठ महत्त्वपूर्ण खनिजांचा साठा आढळला आहे. या शोधामुळे केवळ कोळसा उत्पादनापुरती मर्यादित असलेली कंपनी आता बहुखनिज उत्खननाकडे वाटचाल करू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील आदासा (भूमिगत ते खुली खाण), मकरधोकडा-३ तसेच दुर्गापूर खुली खाण, गौरी-पौनी, मुंगोली-निर्गुडा आणि येकोना-१ व २ या खाणींमध्ये सखोल घटक विश्लेषण करण्यात आले. या तपासणीत पोटॅशियम, टेल्युरियम, टायटॅनियम, लॅन्थॅनम, सेरियम, रेनीयम, सेलेनियम आणि झिरकोनियम ही खनिजे आढळून आली. वेकोलीच्या या शोधामुळे खाणीतील टाकाऊ समजल्या जाणाऱ्या माती-दगडांतूनही मौल्यवान खनिजे मिळू शकतात, हे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे प्रकल्पांचे अर्थकारण सुधारण्यास चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कोळसा उद्योगासमोरील पर्यावरणीय व आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा शोध वेकोलिसाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, अशी चर्चा उद्योगवर्तुळात सुरू आहे.
उद्योगविश्वासाठी महत्त्वाचा शोध
आढळलेली ही खनिजे विविध प्रगत उद्योगांसाठी अत्यावश्यक मानली जातात. पोटॅशियमचा वापर खतनिर्मिती व कृषी रसायनांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. टेल्युरियम सौर ऊर्जा पट्ट्या, अर्धवाहक उपकरणे आणि उष्मा-विद्युत साधनांमध्ये उपयुक्त आहे. टायटॅनियमचा उपयोग विमान उद्योग, संरक्षण क्षेत्र, रंगद्रव्ये आणि विशेष मिश्रधातूंमध्ये केला जातो. लॅन्थॅनम व सेरियम ही ‘रेअर अर्थ’ गटातील खनिजे विद्युत वाहनांच्या मोटारी, कायमस्वरूपी चुंबक, उत्प्रेरक, प्रकाशीय उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक साधनांसाठी महत्त्वाची मानली जातात. रेनीयम अतिउष्णतारोधक मिश्रधातू, जेट इंजिने आणि संरक्षण साहित्य निर्मितीत वापरले जाते. सेलेनियमचा उपयोग काच व इलेक्ट्रॉनिक उद्योगाबरोबरच अक्षय ऊर्जा क्षेत्रात होतो, तर झिरकोनियम अणुऊर्जा, अग्निरोधक साहित्य, मातीभांडी आणि विमान उद्योगासाठी उपयुक्त आहे.
कोळसा उत्खननातील अवशेषांत सापडली संपत्ती
विशेष म्हणजे ही खनिजे कोळसा उत्खननानंतर उरलेल्या माती-दगडी थरांत तसेच खाणीतील अवशेषांमध्ये आढळून आली आहेत. त्यामुळे आतापर्यंत टाकाऊ मानल्या जाणाऱ्या अवशेषांमधूनही मौल्यवान संपत्ती मिळविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपासणीनंतरचा सविस्तर अहवाल हैदराबाद येथील नॉन-फेरस मटेरियल्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर कडे पुढील तांत्रिक मूल्यमापनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच कोल इंडिया लिमिटेड आणि संबंधित तंत्रज्ञान विकास संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती वेकोलिच्या अधिकाऱ्याने ‘पीटीआय’शी बोलताना दिली.
साठा मोजणी ते प्रायोगिक प्रकल्प
या शोधानंतर पुढील टप्प्यात सविस्तर साठा मोजणी, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अभ्यास, प्रायोगिक प्रकल्प उभारणी आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीचा पर्याय यावर भर दिला जाणार आहे. खनिजांचे व्यावसायिक उत्खनन शक्य झाल्यास वेकोलिच्या अर्थकारणात लक्षणीय सुधारणा होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.
