नागपूर : कोरबा-रायपूर प्रवासादरम्यान व्हॉट्सअॅपवर प्राप्त झालेल्या अनारक्षित रेल्वे तिकिटाचा स्क्रीनशॉट दाखविल्याने एका महिला प्रवाशाला दंड भरावा लागला. डिजिटल तिकीट वापरताना रेल्वेच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने स्पष्ट केले.
व्हॉट्सअॅपवरील स्क्रीनशॉट ठरला अवैध
डिजिटल तिकीट सुविधेचा वापर वाढत असला, तरी त्यासंबंधीचे नियम माहिती नसल्यास प्रवाशांना आर्थिक फटका बसू शकतो, याची प्रचिती कोरबा–रायपूर मार्गावरील एका घटनेतून आली. कोरबा-रायपूर प्रवास करणाऱ्या कुमारी अंकिता (नाव बदललेले) यांनी तिकीट तपासणीदरम्यान व्हॉट्सअॅपवर आलेल्या अनारक्षित तिकिटाचा स्क्रीनशॉट दाखविला. मात्र, रेल्वेच्या नियमानुसार तो वैध प्रवास परवाना मानला गेला नाही. त्यामुळे तिकीट तपासनीसांनी त्यांच्याकडून नियमानुसार दंड वसूल केला.
तिकीट तपासणीत उघडकीस आला प्रकार
कोरबा-विशाखापट्टणम लिंक एक्स्प्रेस कोरबा स्थानकातून सायंकाळी ४.१० वाजता सुटल्यानंतर तिकीट तपासणी सुरू झाली. त्यावेळी अंकिता यांनी सादर केलेले तिकीट सायंकाळी ४.४५ वाजता ‘रेल वन’ अॅपद्वारे काढण्यात आल्याचे आढळले. संबंधित तिकीट त्यांच्या भावाने स्वतःच्या नोंदणीकृत मोबाईलवरून काढून त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅपवर पाठविला होता. मात्र, केवळ स्क्रीनशॉट किंवा इतर माध्यमातून प्राप्त झालेली प्रत रेल्वेच्या नियमांनुसार ग्राह्य धरली जात नसल्याने ते तिकीट अवैध ठरविण्यात आले.
डिजिटल तिकीट वापरताना हे नियम महत्त्वाचे
चौकशीदरम्यान संबंधित प्रवाशाने डिजिटल तिकीटासंदर्भातील नियमांची माहिती नसल्याचे सांगितले. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, ‘रेल वन’ अॅपद्वारे काढलेले अनारक्षित तिकीट ज्या मोबाईलमध्ये अॅप नोंदणीकृत आहे आणि ज्यातून तिकीट काढण्यात आले आहे, त्याच मोबाईलमध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅप, स्क्रीनशॉट किंवा इतर माध्यमातून मिळालेली प्रत वैध मानली जात नाही. तसेच प्रवासादरम्यान संबंधित मोबाईल सोबत ठेवणे आणि तिकीट तपासणीवेळी डिजिटल तिकीट दाखविण्यासाठी मोबाईल चार्ज असणे हीदेखील प्रवाशाची जबाबदारी आहे. नोंदणीकृत मोबाईलवरून बुक केलेले तिकीट त्या मोबाईलधारकासाठीच वैध राहते.
दंडाची किमान रक्कम आता ५०० रुपये
या घटनेच्या निमित्ताने दक्षिण -पूर्व- मध्य रेल्वेने प्रवाशांना डिजिटल तिकीट वापराबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वीच वैध तिकीट घेणे, डिजिटल तिकीट स्वतःच्या नोंदणीकृत मोबाईलवरच काढणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले. विशेष म्हणजे, १९ जून २०२६ पासून विनातिकीट किंवा अनियमित तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी किमान दंडाची रक्कम २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी डिजिटल तिकीट सुविधेचा लाभ घेताना रेल्वेच्या नियमांची माहिती करून घेणे गरजेचे असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
