नागपूर : सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवरील व्हॉट्सअॅपवर निमंत्रणे येण्याचे प्रमाण वाढले आहे. याच संधीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे. निमंत्रण पत्रिकेच्या नावाखाली व्हॉट्सअॅपवर ‘एपीके’ फाईल पाठवून ती उघडताच संबंधित व्यक्तीचा मोबाईल हॅक होण्याचे प्रमाण वाढत आहे.
धाडीवाल लेआऊट, पार्वतीनगर येथील रहिवासी राजीव दीपक सौदागर यांच्या सोबत असाच प्रकार अलिकडेच घडला. लग्नाची निमंत्रण पत्रिका उघडताच सौदागर यांचा भ्रमणदूरध्वनी सायबर गुन्हेगारांनी हॅक केला. त्यांच्या संपर्क यादीतील अनेकांना विवाहाच्या निमंत्रणाची धोकादायक फाईल पाठवण्यात आली. ज्यांनी ही फाईल उघडली, त्यांचे मोबाईल त्वरित हँग झाले.
धक्कादायक म्हणजे, एकदा ही फाईल मोबाईलमध्ये सक्रिय झाली की, भ्रमणदूरध्वनीचे संपूर्ण नियंत्रण हॅकर्सच्या ताब्यात जाते. यातून नागरिकांची खासगी माहिती, बँक तपशील आणि इतर संवेदनशील डेटा चोरीला जाण्याचा धोका वाढला आहे.
सायबर तज्ज्ञ काय म्हणतात
- सायबर तज्ज्ञांच्या मते, डिजिटल निमंत्रण पत्रिका साधारणपणे प्रतिमा (जेपीजी) किंवा पीडीएफ स्वरूपात असतात. जर एखादी निमंत्रण पत्रिका एपीके फॉरमॅटमध्ये असेल, तर ती उघडू नका. परिचितांकडून अशी फाईल आली तरी आधी खात्री करून घेणे आवश्यक आहे.
- नागपुरातील अनेक सजग नागरिकांनी यासंदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत. अनेकांचे फोन अचानक बंद होणे किंवा अनोळखी आर्थिक व्यवहार होण्यासारख्या समस्या वाढत आहे.
- हॅकर्स या माध्यमातून वैयक्तिक माहितीची चोरी करत असून पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
असा होतोय ‘डिजिटल’ अटॅक
- परिचितांचे नाव: आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडूनच संदेश आल्याने विश्वास बसतो.चुकीचे फॉरमॅट: लग्नपत्रिका सामान्यत: फोटो जेपीजी किंवा पीडीएफ स्वरूपात असते, मात्र ही फाईल एपीके फॉरमॅटमध्ये असते.
- रिमोट कंट्रोल: फाईल उघडताच फोन हँग होतो आणि हॅकरला मोबाईलचे पूर्ण ‘रिमोट एक्सेस’ मिळते.
- साखळी प्रसार: हॅक झालेल्या फोनवरून इतर सर्व कॉन्टॅक्ट्सना तोच मेसेज आपोआप पाठवला जातो.
ही खबरदारी नक्की घ्या!
- कोणत्याही परिस्थितीत अनोळखी किंवा संशयास्पद डॉट एपीके फाईल डाऊनलोड करू नका.
- ओळखीच्या व्यक्तीने जर अशी फाईल पाठवली, तरी ती उघडण्यापूर्वी संपर्क साधून खात्री करा.
- मोबाईलमध्ये नेहमी नामांकित अँटी-व्हायरस किंवा सुरक्षा प्रणाली अद्ययावत ठेवा.
- फोन हँग झाला, तर तात्काळ इंटरनेट बंद करा आणि फोन ‘फॅक्टरी रिसेट’ करा.
”ज्यांनी एपीके फाईल डाऊनलोड केली, त्यांचे फोन हॅक झाले़ आहेत. एका खात्यातून काही रक्कम देखील वळती झाल्याचा प्रकार घडला आहे़. तक्रार मिळाल्यानंतर खाते वगळले गेले. हा आयपी अॅड्रेस हा कंबोडिया येथील असल्याचे तपासातून समोर आले. त्यामुळे नागरिकांनी सावध होणे आवश्यक आहे़. डॉट एपीके फाईल आल्यानंतर आजीबात डाऊनलोड करू नका. आपल्या भ्रमणदूरध्वनीतले संपर्क क्रमांक, फोटो व अन्य डेटा हॅकरकडे जाऊ शकतो़.” -बळीराम सुतार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर शाखा
माझा फोन हॅक करून विवाहाच्या निमंत्रणाची एपीके फाईल संपर्कातील अनेकांना पाठवली गेली. ज्यांनी ज्यांनी ही फाईल उघडून त्यावर क्लिक केले, त्यांचे मोबाईल हॅक झाले़. काहींचे फोन बंद पडले़. त्यांच्या नंबरवरून इतरांनाही तसेच मेसेज गेले़. -राजीव दीपक सौदागर, पिडीत.
