गडकरी म्हणतात, महापालिका निवडणुकीपूर्वी; तंत्रज्ञ म्हणतात २०१७च्या अखेरीस
शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोलाचे योगदान देऊ शकणारी नागपूरची मेट्रो रेल्वे कधी धावणार याबाबत मेट्रोचे तंत्रज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांची वेगवेगळी मते आहेत. नागपूरचे खासदार आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मते मेट्रोच्या पहिला टप्प्यावरील वाहतूक ही महापालिका निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे या वर्षीच्या डिसेंबर अखेपर्यंत धावणार तर तंत्रज्ञांनी मात्र यासाठी सोळा महिन्यांचा अवधी निश्चित केला आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये प्रवास करण्याची नागपूरकरांना संधी नेमकी कधी मिळणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पुढील वर्षांच्या सुरुवातीला नागपूरमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्दांचा निवडणूक प्रचारासाठी सत्ताधारी भाजपकडून वापर होणे अपेक्षित आहे आणि तसा तो केलाही जात आहे. मात्र तो करताना नेत्यांना घाई झाल्याचे त्यांच्या अलीकडच्या काळातील वक्तव्यावरून स्पष्ट होते.
मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील खापरी ते सीताबर्डी (मुंजे चौक) या टप्प्याचे काम वर्धामार्गावर गतीने सुरू आहे. यापैकी खापरी ते नवीन विमानतळ या दरम्यान जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोच्या मार्गाचे काम रूळ टाकण्यापयर्ंत झालेले आहे तर त्यापुढील टप्प्यात ही गाडी सिमेंटच्या खांबावरून धावणार असून त्यासाठी खांब उभारणीचे कामही सुरू झाले आहे. हे सर्व काम पूर्ण होऊन त्यावरून मेट्रोची पहिली चाचणी घेण्यास किमान सोळा महिन्यांचा (डिसेंबर २०१७ पर्यंत) वेळ लागेल, असे मेट्रोच्या तांत्रिक शाखेचे म्हणणेआहे व तसे त्यांनी अधिकृतरित्या शनिवारी जाहीरही केले आहे. मात्र, त्याच दिवशी दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे येत्या सहा ते आठ महिन्यांत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार, असे सांगितले आहे. त्यामुळे मेट्रो नेमकी कधी धावणार? असा प्रश्न पडला आहे.
मेट्रोच्या बर्डीपर्यंतच्या कामात सर्वात मोठा अडथळा हा छत्रपती पुलाचा येणार आहे, त्याचा काही भाग तोडावा लागणार असून हे काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे आणि ते एक महिन्यार्पयच चालणार, असे मेट्रो प्रशासनाचेच म्हणणे आहे. त्यानंतर त्याची पुनर्रबांधणी, करावी लागणार आहे, दुसरीकडे याच हॉटेल प्राईड ते हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट या दरम्यान आणखी एक दोन मजली पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने हे काम होणार आहे. या शिवाय स्थानके, त्यासाठी लागणारी जागा, भूसंपादन याचीही कामे शिल्लक आहेत. फक्त जमिनीवर धावणाऱ्या काही किलोमीटरचा भाग सोडला तर इतर कामांचा बराच टप्पा पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार आहे.