नागपूर : बंदिस्त प्रजनन केंद्रात जन्मलेल्या पांढऱ्या पाठीच्या गिधाडाने नैसर्गिक अधिवासात यशस्वीपणे जुळवून घेतल्याचे त्याच्या तब्बल १३ हजार किलोमीटरहून अधिक भ्रमंतीतून स्पष्ट झाले आहे. पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रात जन्मलेले ‘एन-०९’ हे नर गिधाड डिसेंबर २०२४ मध्ये जंगलात सोडण्यात आले होते. जवळपास २१ महिन्यांपासून ते जंगलात स्वतंत्रपणे वास्तव्य करत असून, जंगली गिधाडांसोबत अन्नशोध आणि खाद्य घेताना त्याचे निरीक्षण करण्यात आले आहे.

उत्तराखंड ते पाकिस्तान व्याप्त काश्मीर

‘एन-०९’चा जन्म २०२३ मध्ये पिंजोर येथील केंद्रात झाला. १७ डिसेंबर २०२४ रोजी सोडण्यात आलेल्या २५ पांढऱ्या पाठीच्या गिधाडांमध्ये त्याचा समावेश होता. प्रत्येक गिधाडाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर बसविण्यात आला होता. सोडल्यानंतर सुरुवातीचे सुमारे १५ महिने ‘एन-०९’ पिंजोर-शिवालिक परिसरातच राहिले. मार्च २०२६पासून त्याने लांब पल्ल्याची भ्रमंती सुरू केली. उत्तराखंडमधील हल्द्वानी आणि तराई भागापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने हिमाचल प्रदेश, पठाणकोट आणि जम्मूचा परिसर गाठला. त्याची सर्वाधिक नोंदलेली हालचाल पिंजोरपासून सुमारे ४०५ किलोमीटर अंतरावरील पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील खुईरट्टा-कोटला भागापर्यंत झाली. त्यानंतर ते हिमाचल प्रदेशात परतले असून कांगडा-उना परिसरात त्याचे वास्तव्य आहे.

१३ हजार किमीची भ्रमंती; ३,१४४ मीटर उंची

जीपीएस नोंदीनुसार ‘एन-०९’ने आतापर्यंत १३ हजार किलोमीटरहून अधिक भ्रमंती केली आहे. या काळात त्याची कमाल उंची समुद्रसपाटीपासून ३,१४४ मीटर नोंदली गेली. ही १३ हजार किलोमीटरची आकडेवारी सलग उड्डाणाचे अंतर नसून जीपीएसवर नोंदलेल्या विविध ठिकाणांमधील हालचालींची एकत्रित नोंद आहे.

२५पैकी ११ गिधाडे जंगलात

डिसेंबर २०२४ मध्ये सोडण्यात आलेल्या २५ गिधाडांपैकी सुमारे ११ गिधाडे अद्याप जंगलात जिवंत असून, नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेत असल्याचे निरीक्षणात आले आहे. मात्र, काही गिधाडांच्या मृत्यूमुळे त्यांच्या अधिवासातील धोक्यांकडेही लक्ष वेधले गेले आहे. विशेषतः वीजवाहिन्या आणि विद्युत संरचनांमुळे गिधाडांना धोका निर्माण होत आहे. जीपीएसच्या माध्यमातून गिधाडांचे प्रमुख उड्डाणमार्ग, खाद्य आणि विश्रांतीची ठिकाणे ओळखता येत असल्याने धोकादायक वीजखांब आणि वाहिन्यांवर प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य आहे. त्यामुळे गिधाडांचे प्रजनन करून त्यांना जंगलात सोडण्याबरोबरच त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ‘एन-०९’च्या प्रवासातून अधोरेखित झाले आहे.