नागपूर: भाजप नेत्यां माजी महापौर माया इवनाते यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. पक्षाने आज अधिकृतरित्या त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या नावाची घोषणा ही पक्षीय वर्तुळात आश्चर्यकारक मानली जाते. त्यांच्या रुपात भाजपने एका आदिवासी महिलेला संधी दिली आहे.
 माया इवनाते या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि नागपूर महानगरपालिकेच्या माजी महापौर आहेत.  त्या पहिल्या आदिवासी महापौर आहेत. १५ जुलै २००७ पासून २३ डिसेंबर २००९ पर्यंत नागपूर महापौर म्हणून कार्य केले. महापौरपदावर काम करून शहराच्या प्रशासकीय कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगात (NCST) माया इवनाते सदस्या म्हणून नियुक्त होत्या आणि त्यांनी विविध बैठका, समीक्षा कार्यक्रम आणि तक्रारींच्या प्रकरणांवर आयोगाच्या वतीने काम केले आहे. २०२६ च्या निवडणुकीत त्या पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांची एका समितीच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे अनेक वर्षांपासून नागपूर शहर भाजप मध्ये सक्रिय आहे. शहर, प्रदेश भाजप मध्ये विविध पदावर कार्य करण्याचा अनुभव आहे.

-२०२६ निवडणुकीत नागपूर महानगरपालिका मध्ये प्रभाग १२ मधून भाजपच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.  यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष नागपूर महानगरपालिका मध्ये नगरसेवक राहिलेल्या आहेत.

मायाताई इवनाते, भाजपचा आदिवासी चेहरा अशी त्यांची ओळख आहे.
राजकीय कारकीर्द
२००२ – नगरसेवक भाजप
२००७ – महापौर, नागपूर
२०१२ – नगरसेवक, ( भाजप प्रदेश उपाध्यक्ष)
२०१७ – राष्ट्रीय आदिवासी आयोग सदस्य
२०२६ – नगरसेवक आणि अग्निशमक सभापती मनपा नागपूर

भाजपचे धक्कातंत्र

भाजप राज्यसभेवर कोणाला पाठवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याकरिता पक्षाच्यावतीने २५ उमेदवारांची यादी केंद्राकडे पाठवण्यात आली होती. यापैकी चार उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली आहे. चार उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली. यात नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते समावेशअसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

विशेष म्हणजे मायाताई या महिनाभरापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. राज्यसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जात आहे याची कल्पना मायाताईंना नव्हती. मात्र त्यांना काल भाजप कार्यालयातून कॉल करून ताबडतोब मुंबईला बोलावून घेतले होते. भाजपने त्यांना तुमचे नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याचे सांगून त्यांना सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे विदर्भातून माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होती. पूर्व विदर्भातूनही अनेकांनी इच्छा दर्शवली होती. यात गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांचा समावेश होता.

भाजपने मायाताई इवनाते यांच्यासह विनोद तावडे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ती झाली नाही तरी भाजपकडे असलेले आमदारांच्या संख्याबळ लक्षात घेता चारही उमेदवार आरामात निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेचासुद्धा एक उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर त्यांचाही एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. मायाताई यांना भाजपने महापौर केले होते. पंधरा वर्षापूर्वी महापौरपदाचे आरक्षण आदिवासी समाजासाठी निघाले होते. भाजपने हलबा समाजाचे देवराव उमरेडकर यांना महापौर केले होते. मात्र त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने महिनाभरातच मायाताई यांची लॉटरी लागली होती.