नागपूर : राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या कुटुंबातील शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे पवार कुटुंबात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली होती. अखेर याबाबत अजित पवार यांनी नागपूर येथील चिंतन शिबिरात आपली भूमिका स्पष्ट केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे चिंतन शिबीर गेल्या वर्षी नागपुरात झाले होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय का घेतला, याचे स्पष्टीकरण दिले होते.
“भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये आम्ही सहयोगी आहोत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांमधील वेदना का स्वीकारल्या, असे अनेक लोक मला विचारतात. मी तुम्हाला मनापासून सांगतो की हे पाऊल सत्ता किंवा पदासाठी उचललेले नाही. महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयां ची गरज आहे. या अंतःकरणातील हाकेला ओ देत आम्ही हा मार्ग स्वीकारला आहे,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी कुटुंबातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत दिले होते.
‘मी माझी सामाजिक ओळख सांगतो’
याच शिबिरात अजित पवार यांनी आपली सामाजिक भूमिका देखील मांडली होती. शिबिराच्या एक दिवस आधी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसींसाठी मंत्रिमंडळातील एकमेव आशेचा किरण असल्याचे वक्तव्य केले होते. या विधानानंतर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. “मित्रांनो, मी माझी सामाजिक ओळख स्पष्ट करू इच्छितो. मी मराठा समाजात जन्मलेला कार्यकर्ता आहे. मात्र महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा, ओबीसी, मागासवर्गीय, धनगर, तेली, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, नवबौद्ध अशा समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाची आणि उन्नतीची जबाबदारी माझी आहे. हे भान ठेवूनच मी काम करतो,” असे अजित पवार यांनी सांगितले होते.

