नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारोपानिमित्ताने आजी-माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी स्नेह मेळावा आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑगस्टला विद्यार्थी मेळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशासह संपूर्ण जगाच्या विविध भागांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये सेना, उद्योग, खेळ, पत्रकार, विविध शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आणि नामवंत उच्च पदावर विभूषित जवळपास १०० माजी विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

विद्यापीठाची सुवर्ण जयंती आणि अमृत महोत्सवानिमित्ता प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना घड्याला आणि सुटकेस अशी भेटवस्तू देण्यात आली होती. आता शताब्दी महोत्सवाचा समारोप सोहळा ४ ऑगस्टला होणार आहे. यावेळीही सर्वांना हा दिवस लक्षात राहावा यासाठी अशाच स्वरूपाची भेटवस्तू देण्यात यावी अशी मागणी नागपूर विद्यापीठ कर्मचारी संघाने केली आहे. तसेच निवेदन कुलगुरूंना देण्यात आले आहे.

हेही वाचा >>>अमोल मिटकरी वाहन हल्ला प्रकरणातील मनसैनिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार, आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, आदर्श अधिकारी पुरस्कार, आदर्श कर्मचारी पुरस्कार, प्राचार्य बलराज अहेर स्मृती सुवर्णपदक, उत्कृष्ट विद्यार्थी आदी पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. या कार्यक्रमाची आठवण कायम राहावी या उद्देशाने विद्यापीठाने भेटवस्तू देण्याच्या निर्णयाचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी होत आहे. यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्काराने यंदा कृषितज्ज्ञ डॉ. सी.डी. मायी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय प्राचार्य बलराज अहेर स्मृती सुवर्णपदकाने संगीता आत्राम यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

असे राहणार कार्यक्रमाचे स्वरूप

२ ऑगस्टला दुपारी ४ वाजता आजी-माजी शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी स्नेह मेळावा तर ३ ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे. ३ ऑगस्टला विद्यार्थी मेळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशासह संपूर्ण जगाच्या विविध भागांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये सेना, उद्योग, खेळ, पत्रकार, विविध शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आणि नामवंत उच्च पदावर विभूषित जवळपास १०० माजी विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचा मुख्य समारोप समारंभ ४ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित राहणार आहेत.