नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात शुक्रवारपासून बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तर ३ जून रोजी पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरुर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. हेही वाचा - दहावीतही बुलढाणा विभागात द्वितीय! ९३.९० टक्के निकाल; सावित्रीच्या लेकीच आघाडीवर! संबंधित लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष यांना बोलावले जाणार आहे. परंतु नागपुरात शहरातील माजी खासदार आणि माजी आमदार यांना निमंत्रण मिळाले नाही. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाणिवपूर्वक असे केल्याचा आरोप होत असून अशाप्रकारे शहरातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.