नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दोन दिवसांचा रशिया दौरा केला आहे. भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी रशियाला शिक्षणासाठी जातात. यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी म्हणजेच एमबीबीएससाठी रशियाला जातात. भारतीय विद्यार्थी रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी का जातात ते जाणून घेऊया. भारतीय विद्यार्थ्यांना एमबीबीएसमध्ये प्रवेश कसा मिळतो आणि फी किती आहे?

भारतात एमबीबीएस करण्यासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना समुपदेशनाद्वारे सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळतात. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे समुपदेशन आयोजित केले जाते. सध्या, १५ हजारांहून अधिक विद्यार्थी रशियामध्ये शिकत आहेत आणि यातील बहुतेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.

हेही वाचा – पक्षांतर्गत दुफळी, प्रचाराच्या दोन वाटा! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा काँग्रेसमध्ये नेमके काय सुरु आहे?

भारतीय विद्यार्थ्यांना रशियाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह किमान ५० टक्के गुण असावेत. रशियाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये वगळता, एमबीबीएसचा अभ्यास खूप महाग आहे. एका प्रसार माध्यमाच्या वृत्तानुसार हा कोर्स खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये ६० ते ७० लाख रुपयांमध्ये पूर्ण केला जातो. तर रशियामध्ये एमबीबीएसचा अभ्यास यापेक्षा कमी खर्चात पूर्ण केला जातो. हा कोर्स ६ वर्षांचा आहे, ज्यामध्ये एक वर्ष अनिवार्य इंटर्नशिपदेखील समाविष्ट आहे. वृत्तानुसार, रशियामध्ये १५ ते ३० लाख रुपयांमध्ये एमबीबीएस पूर्ण केले जाते, ज्यामध्ये वसतिगृह शुल्कदेखील समाविष्ट आहे. यासह इतर अनेक वैद्यकीय विद्यापीठे आहेत, ज्यात भारतीय विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही या संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊ शकता.

हेही वाचा – अजित पवारच का लक्ष्य ?

नीट पेपरफुटीमुळे काय परिणाम झाला

भारतातील एमबीबीएस, बीडीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनटीएद्वारे ५ मे रोजी नीट २०२४ परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ४ जून रोजी निकाल जाहीर झाला. जाहीर होताच त्यावरून वाद सुरू झाला. पेपरफुटी आणि परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. पेपर लीक प्रकरणी बिहारमध्येही अनेकांना अटक करण्यात आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीअय करत असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. रशियामध्ये एमबीबीएसचा कालावधी ५ वर्षे ८ महिने आहे. ज्याला भारतातील बहुसंख्य लोक सहसा ६ वर्षे म्हणतात. रशियामध्ये ६ वर्षांचा संपूर्ण एमबीबीएस अभ्यासक्रम भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात शिकवला जातो. भारतात झालेल्या पेपरफुटीमुळे लोक आता रशियामध्ये एमबीबीएस करण्याकडे वळले आहेत.