नागपूर : नागपूर–मुंबई दरम्यान ताशी ३५० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा प्रस्ताव सादर होऊन जवळपास चार वर्षे उलटली असली, तरी अद्याप या प्रकल्पाला केंद्र सरकारची औपचारिक मंजुरी मिळालेली नाही. अलीकडे सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सात नव्या बुलेट ट्रेन मार्गांची घोषणा करण्यात आली; मात्र विदर्भासाठी महत्त्वाचा मानला जाणारा नागपूर–मुंबई मार्ग यामध्ये समाविष्ट नसल्याने पुन्हा एकदा विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

२०२२ मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नागपूर–मुंबई उच्चगती रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मांडला होता. सुमारे ७५० किलोमीटर लांबीच्या या मार्गात मुंबई, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि नागपूर या प्रमुख शहरांचा समावेश होता. या प्रकल्पामुळे सध्या सुमारे १२ तास लागणारा रेल्वे प्रवास अवघ्या साडेतीन तासांत पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, हा डीपीआर अद्याप केंद्राच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “नागपूर–मुंबई बुलेट ट्रेनसाठी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून डीपीआरही तयार आहे. मात्र, पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर प्रवासी मागणी अधिक असल्याने त्या मार्गांना प्राधान्य देण्यात आले असावे. भविष्यात बुलेट ट्रेनचे जाळे इतर शहरांपर्यंत विस्तारले जाईल, असे संकेत आहेत.” अजनी स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि दोन्ही शहरांदरम्यान अधिक रेल्वेगाड्या सुरू झाल्यानंतर नागपूरलाही बुलेट ट्रेन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, रेल्वेतील माजी कर्मचाऱ्यांनी या विलंबावर नाराजी व्यक्त केली आहे. “विदर्भाकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. आधीच प्रस्तावित असलेले मार्ग प्रगतीपथावर न नेता नव्या राष्ट्रीय पातळीवरील मार्गांची घोषणा का करण्यात आली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रगत तांत्रिक निकषांवर आधारित या सुमारे ७४९ किलोमीटर लांबीच्या मार्गात १२ स्थानके, १५ बोगदे, सुमारे १,२४५.६१ हेक्टर जमीन संपादन आणि प्रत्येकी ७५० प्रवासी क्षमतेच्या गाड्यांचा समावेश प्रस्तावित आहे. गाड्यांचा वेग ३३० ते ३५० किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे. प्रकल्पाची एकूण किंमत अद्याप निश्चित झालेली नसली, तरी ५०८ किलोमीटर लांबीच्या मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत १.१० लाख कोटी रुपयांहून अधिक असल्याने, नागपूर–मुंबई मार्गासाठी याहून अधिक खर्च अपेक्षित असल्याचे मानले जात आहे.

प्रस्तावित मार्ग व वैशिष्ट्ये :

हा उच्चगती रेल्वे मार्ग समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, ग्रीनफिल्ड क्षेत्रे तसेच काही ठिकाणी शहरांच्या मुख्य रस्त्यांलगत जाण्याची शक्यता आहे. शाहापूर, इगतपुरी, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, जालना, मेहकर, मालेगाव जहांगिर, करंजा लाड, पुलगाव, वर्धा आणि नागपूर अशी स्थानके प्रस्तावित आहेत. उन्नत, भुयारी आणि जमिनीवरून अशा मिश्र रचनेचा समावेश असून भूकंप तातडी शोध व इशारा प्रणालीसह अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहेत.