जगातील सर्व प्राण्यात बहुतेक हा एकटाच असा प्राणी म्हटल्या जातो, कात टाकणारा. म्हणजेच त्वचा गळून पडणारा साप हा जीव होय. निसर्गातील रहस्यमय जीवांत सापाचा समावेश वरच्या क्रमांकावर होतो. पाहताच भीती वाटते. सापाशी जोडलेल्या अनेक गोष्टी मानवाला नेहमीच आकर्षित करतात. त्यातीलच एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सापाने कात टाकणे (Shed skin किंवा Ecdysis). अनेकदा जंगलात किंवा शेतातील झुडपांमध्ये सापाची संपूर्ण कातडी तशीच अखंड पडलेली पाहायला मिळते. पण, साप आपली कातडी नक्की का आणि कशी टाकतो? यामागे केवळ शरीराची वाढ हेच कारण आहे की आणखी काही वैज्ञानिक रहस्य दडले आहे?
प्राणी शास्त्रज्ञ म्हणतात
प्राणीशास्त्रज्ञांनी रंजक माहिती स्पष्ट केली आहे. शरीराच्या वाढीसोबत त्वचा वाढत नाही मानव किंवा इतर सस्तन प्राण्यांची त्वचा शरीराच्या वाढीसोबत आपोआप विकसित होते आणि जुन्या मृत पेशी दररोज सूक्ष्म स्वरूपात गळून पडतात. मात्र, सापांच्या बाबतीत असे होत नाही. सापाच्या शरीराचा बाह्य थर (Epidermis) हा कडक आणि लवचिकता नसलेला असतो. जेव्हा सापाच्या शरीराचा आकार वाढतो तेव्हा जुनी त्वचा त्याला लहान पडू लागते. त्यामुळे नवीन वाढीसाठी जुनी कातडी पूर्णपणे सोडून देणे सापासाठी अनिवार्य ठरते.कात टाकण्याच्या प्रक्रियेला विज्ञानात ‘एक्डिसिस’ (Ecdysis) असे म्हटले जाते.
असा बदल घडतो
कात टाकण्यापूर्वी सापाचे डोळे अंधुक, दुधासारखे पांढरट किंवा निळसर दिसू लागतात. जुन्या आणि नवीन त्वचेच्या मध्ये एक विशिष्ट द्रव पदार्थ तयार झाल्यामुळे असे घडते. या काळात सापाची दृष्टी मंदावते ज्यामुळे तो अत्यंत संवेदनशील बनतो आणि सुरक्षित ठिकाणी लपून राहतो. जेव्हा नवीन त्वचा पूर्णपणे तयार होते, तेव्हा साप दगड, खडकाची कडा किंवा झाडाच्या खोडासारख्या टणक वस्तूवर आपले तोंड घासतो. त्यामुळे तोंडाजवळची कातडी फाटते. त्यानंतर साप पुढे सरकत आपली जुनी कातडी उलट्या मोज्याप्रमाणे (Sock turned inside out) शरीरावरून पूर्णपणे काढून टाकतो.
आरोग्य रक्षण साध्य
परजीवी कीटकांचा नाश आणि आरोग्य रक्षण कात टाकणे हे केवळ शारीरिक वाढीसाठीच नाही तर सापाच्या आरोग्य रक्षणासाठीही आवश्यक असते. वेळोवेळी कात टाकल्यामुळे सापाच्या जुन्या त्वचेवर जमा झालेले परजीवी कीटक (Mites), बुरशी आणि विविध प्रकारचे संसर्ग नष्ट होतात. यामुळे सापाची नवीन त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार राहते. सापाला पापण्या नसतात. डोळ्यांचे रक्षण करणाऱ्या पारदर्शक थराची (Brille) त्वचासुद्धा कातडीसोबत बाहेर पडते.
वय व सापाची कात
वेगाने वाढणारे तरुण साप वर्षातून अनेकदा कात टाकतात तर पूर्ण वाढ झालेले वयस्क साप वर्षातून साधारण २ ते ४ वेळा कातडी बदलतात.कात टाकल्याने सापाचे विष वाढते, हा गैरसमज आहे. कात टाकतेवेळी त्याची दृष्टी अंधुक होते. परिणामी तो अधिक सावध होतो. स्वतःच्या रक्षणाचा त्याचा हेतू असतो. मात्र नाहक आक्रमक होत नसतो.
