भंडारा : रात्रीच्या सुमारास जंगलातून भरकटलेलं एक अस्वल थेट एका घरात शिरलं. सुदैवाने या घरातील मंडळी शेजारच्या घरी बसलेली होती. मात्र घरात अस्वल शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि नागरिकांनी एकच गर्दी केली.

तब्बल दीड तास अस्वल घरात ठाण मांडून बसले होते. दरम्यान वन अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने घरातून अस्वलाची सुटका करत तिला जेरबंद केले आणि तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. रात्री उशिरापर्यंत अस्वलाचा हा थरार नागरिकांनी अनुभवला.

मागील महिन्यात लाखांदूर तालुक्यातील लाखांदूरमधील चप्राड डोंगरावर अस्वलाचा वावर असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. दुर्गामाता मंदिर परिसरात अस्वलाचा मुक्त संचार काही भाविकांनी कॅमेरात कैद केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या अस्वलाला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. दरम्यान काल लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी या गावात एका घरात अस्वल शिरल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले.

लाखांदुर वनपरिक्षेत्रा अंतर्गत पिंपळगाव कोहळी गावातील बौध्द विहार पिंपळगाव को. प्रभाग क्रमांक ३ मधिल सौ. इंदुबाई नानाजी बारसागडे यांचे राहते घरी एक अस्वल घरामध्ये दडीमारून बसले असल्याची माहिती वन विभागाला काल रात्री मिळाली. माहिती mमिळताच वनक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.

घरात अस्वल आणि बाहेर संतप्त नागरिक. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम संतप्त जमावाला पांगवून/शांत केले त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा घरात घुसलेल्या अस्वलाकडे वळवला. घरात दडी मारून अस्वलाचे फिजीकल रेस्क्यु करून त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

सदर कार्यवाही उपवनसंरक्षक योगेद्र सिंग व सहाय्यक वनसंरक्षक साकोली संजय मेंढे यांचे मार्गदर्शनात वनक्षेत्र अधिकारी पी. बी. चन्ने व वनरक्षक लाखांदूर पवळे , जारवाल, कदम, गिरेपुंजे, गायकवाड, नागरगोजे, डेव्हिड मेश्राम, तसेच जीवशास्त्रज्ञ शुभम मोदनकर शिघ्र बचाव दलाचे शशांक तुरसकर, अविनाश नागपुरे, अमोल नागरीकर, निशी वानगखेडे, नरेंद्र उरकुडकर, शरद ताइतकर, वाहनचालक उमेश वाढीवे, नामेदव मेश्राम, जागेश्वर कांबळे, गजानन जुंबले, मुकेश जांभुळकर तसेच पीआरटी लाखांदूर यांनी अस्वलाचे रेस्क्यु करून रात्री १२.३० वाजता नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

गावात पहिल्यांदा शिरले अस्वल…

लाखांदूर वनपरिक्षेत्रात अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव कोहळी या गावालगत घनदाट जंगल आहे, त्यामुळे बिबट, वाघ अशा वन्य प्राण्यांचा कायमच गावात वावर असतो. मात्र अशाप्रकारे अस्वल गावात येण्याची ही पहिल्याच पहिलीच वेळ आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील वन्यप्राण्यांचा, विशेषतः बिबट्याचा, मुक्त संचार आढळून आला आहे. घनदाट झुडपांमुळे या परिसरात अस्वलासह इतर वन्यप्राण्यांचाही वावर आहे. त्यमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.