गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सध्या रानटी हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोठणगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव-बंध्या परिसरात गेल्या ११ मार्चपासून हत्तींच्या कळपाने उच्छाद मांडला आहे. मकापिकासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत हा कळप आता मानवी वस्तीकडेही वळत असल्याचे चित्र दिसत आहे.

आज मंगळवार ७ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८:३० वाजताच्या सुमारास काही शेतकरी आपल्या रोजच्या कामासाठी शेतात गेले असता अचानक हत्तींच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यामुळे शेतकरी अक्षरशः गोंधळून गेले. हत्तींच्या कळपाने मागून जोरदार धक्का देत शेतकऱ्यांना तुडवून लावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दयाराम घुगुसकर, आसाराम निमकर आणि उज्वल चिंचेकर (सर्व रा. वडेगाव-बंध्या) हे शेतकरी जखमी झाले. सुदैवाने या सर्वांनी प्रसंगावधान राखत जीव वाचवण्यासाठी शेतातून पळ काढला आणि मोठा अनर्थ टळला.

जखमी शेतकऱ्यांना तातडीने केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रारंभी काहींना खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार देण्यात आले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे, मात्र मानसिक धक्का मोठा असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, हत्तींच्या या सततच्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. रात्रीच नव्हे तर आता दिवसा देखील शेतात जाणे धोकादायक बनले आहे. पिकांचे नुकसान, जनावरांवरील संकट आणि जीवितहानीची भीती यामुळे शेतकरी अक्षरशः चिंतेच्या छायेत जगत आहेत.

गोठणगाव वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या हत्तींच्या कळपावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कळपाचा हालचालींचा मागोवा घेत त्यांना जंगलाच्या दिशेने परत वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा कळप जर गावाच्या दिशेने सरकला तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वनविभागाने नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेतात जाताना समूहाने जाणे, सकाळ-संध्याकाळच्या वेळेत विशेष काळजी घेणे, तसेच हत्ती दिसल्यास तत्काळ वनविभागाला कळवणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या कुशीत जगणाऱ्या या ग्रामीण भागात आता भीतीची एक अनाम छाया पसरली आहे. वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.