वन्यजीव गुन्हे कक्षासह अपराध नियंत्रण शाखाही आवश्यक

केंद्राच्या निर्देशानंतर तामिळनाडूमध्ये नुकतेच वने आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापन करण्यात आली आहे.

प्रकरणांचा निकाल जलदगतीने लावण्यास मदत होणार

नागपूर : वन्यजीवांच्या शिकारी, अवयव तस्करी रोखण्यासाठी केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रात वन्यजीव गुन्हे कक्ष उभारला जात आहे, पण त्यासोबतच राज्याची स्वतंत्र वन्यजीव अपराध नियंत्रण शाखा असावी, अशी देखील मागणी आता समोर येत आहे. केंद्राच्या निर्देशानंतर तामिळनाडूमध्ये नुकतेच वने आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या २०२० च्या अखेरीस झालेल्या बैठकीत केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या धर्तीवर राज्यातही अशी शाखा स्थापन करण्यात यावी, अशी मागणी मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी केली होती. तत्पूर्वीच २०१४ मध्ये केंद्राने राज्याची स्वतंत्र अपराध नियंत्रण शाखा स्थापन करण्याबाबत पत्र दिले होते. महाराष्ट्रात ही शाखा स्थापन करण्याऐवजी केरळच्या धर्तीवर अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करून वन्यजीव गुन्हे कक्ष तयार करण्यात आला आहे. या सॉफ्टवेअरमध्ये सुमारे दहा वर्षांपूर्वीची वन्यजीव गुन्हेगारीची प्रकरणे अंतर्भूत केली जाणार आहेत. वन्यजीव गुन्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. कक्षामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांचे नियमित काम करून वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाचे काम करायचे आहे. त्यामुळे त्याचा परिणाम गुन्ह्याच्या तपासावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वन्यजीव गुन्हे हा कायदेविषयक व खूप मोठा विषय आहे. न्यायालयीन कामकाज प्रभावी होण्याच्या दृष्टीने आणि कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस खात्याप्रमाणे स्वतंत्र गुन्हे शाखा असेल तर कामाची निश्चिती होऊन प्रकरणे त्वरित मार्गी लागतील. त्याचदृष्टीने तामिळनाडू राज्यात शिकार आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापारासह वने आणि वन्यजीव गुन्ह्याचा सामना व नियंत्रण करण्यासाठी वने आणि गुन्हे नियंत्रण शाखा नुकतीच स्थापन केली आहे. यात चार प्रादेशिक कार्यालयांसह गुन्हेगारीची माहिती बँक, गुप्तचर जमा करणे अशा काही कृतिबिंदूचा समावेश आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातही वन्यजीव गुन्हे अपराध नियंत्रण शाखा असावी, अशी मागणी राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी केली आहे. वन्यजीव गुन्हे कक्षाची मदत तर होणारच आहे, पण त्याचवेळी वन्यजीव गुन्हे अपराध नियंत्रण शाखा असेल तर प्रकरणांचा निकाल जलदगतीने लागेल, असे ते म्हणाले. २०११ ते २०२१ या दरम्यान वाघांच्या एकूण  मृत्यूपैकी ४३ टक्के प्रकरणात वाघांची शिकार झाली आहे.  बिबट्यांच्या एकूण मृत्यूमधील २६ टक्के बिबट्यांनी शिकारीमुळे प्राण गमावले आहेत. उर्वरित प्राण्यांविषयी माहितीच उपलब्ध नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wildlife crime cell set up in maharashtra to curb wildlife poaching zws

ताज्या बातम्या