नागपूर : जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्ग किंवा संवेदनशील महामार्गावर वन्यप्राण्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावे म्हणून तयार केले जाणारे शमन मार्ग हे वाघ, सिंह यासारख्या प्राण्यांसाठी शिकारीचे मैदान नाही, तर वन्यप्राण्यांसाठी ते सुरक्षित रस्ता ओलांडण्याचे ठिकाण आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने पेंच व्याघ्रप्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वर केलेल्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढला.
संवेदनशील भागातून जाणाऱ्या रस्त्यावर वन्यप्राण्यांचे वाहनांखाली येऊन होणारे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर शमन उपाय (भुयारी मार्ग, उड्डाणपूल आदी) केले जातात. जगभरात वन्यजीवांसाठी अशा शमन उपायांचा वापर केला जातो. यामुळे वन्यजीव भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली येत नाही आणि ते सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकतात.
कॉरिडॉर म्हणून वन्यप्राणी या शमन मार्गाचा वापर करतात. मात्र, हे शमन मार्ग शिकारीचे मैदान ठरत असून वाघ, बिबट यासारखे प्राणी त्याचा वापर शिकारीसाठी करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तसेच यामुळे शमन उपायांची कार्यक्षमताही कमी होत असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचा शोध घेण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने पेंच व्याघ्रप्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्गाचा सलग दोन-तीन वर्षे अभ्यास केला.
या महामार्गावर संस्थेने उभारलेल्या नऊ शमन उपायांच्या ठिकाणी त्यांनी कॅमेरा ट्रॅप व इतर माध्यमातून चाचणी केली. त्यावेळी हे शमन मार्ग शिकारीचे मैदान नसून वन्यप्राणी सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी त्याचा वापर करत असल्याचे संस्थेच्या वैज्ञानिकांच्या लक्षात आले.
ज्या शमन उपायांवर वाघ, बिबट यासारख्या प्राण्यांनी तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारी केल्या ते शमन उपाय ५० ते ८० मीटर रुंदीचेच आहेत. त्यामुळे भक्षक आणि भक्ष्य समोरासमोर येतात. परिणामी भक्ष्याला पळण्यासाठी जागा मिळत नाही. मात्र, राष्ट्रीय महामार्ग ४४ वर भारतीय वन्यजीव संस्थेने उभारलेले शमन उपाय हे १०० ते ७५० मीटर रुंदीचे आहेत. त्यामुळे भक्षक आणि भक्ष्य सहजासहजी समोरासमोर येत नाहीत आणि आल्यास भक्ष्याला पळून जाण्यास भरपूर जागा मिळते. या महामार्गावर संस्थेच्या अभ्यासकांना शिकारीच्या घटना आढळून आल्या नाहीत. केवळ जंगली कुत्र्याकडून शिकार करण्याच्या प्रयत्नांच्या चार घटनांची नोंद कॅमेरा ट्रॅपमध्ये झालेली आढळून आली.