अकोला : जिल्ह्यातील बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत मादी बिबटचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
जिल्ह्यात विविध ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याचे समोर आले आहे. बाळापूर तालुक्यात अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाले. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले. दरम्यान, अज्ञात भरधाव वाहनाने बिबट्याचा बळी घेतला आहे. बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिली.
त्यामध्ये गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच बिबटने प्राण सोडले. या दुर्घटनेनंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक वनसंरक्षक पवन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात यांच्या आदेशानुसार वनपाल गजानन गायकवाड, मानद वन्यजीवरक्षक बाळ काळणे, वनरक्षक एन. एन. सावळे, वनरक्षक राम काकडे, यशपाल इंगोले, तुषार अवारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वाहनाच्या धडकेत मरण पावलेली बिबट मादी दोन ते अडीच वर्ष वयाची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिबट मादीचा मृतदेह पशुवैद्यकीय महाविद्यालया हलवून उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास वनविभागाकडून केला जात आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबटचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात बिबटचा वावर असल्याने सावध व सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाने केल्या आहेत. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
वन्यजीवांची सुरक्षा धोक्यात
वन्यजीव शहराकडे धाव घेत आहेत. विविध शहरांमध्ये सध्या बिबट्याचा वावर आढळून आला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून काही जणांचे बळी देखील गेले आहेत. त्यामुळे बिबट्याची चांगलीच दहशत पसरली. दरम्यान, वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर काही दिवसांअगोदरच एका बिबट्याचा बळी गेला.
अकोला ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील सावरगाव जवळ रस्ता ओलांडत असताना दोन बिबट्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रस्त्यावर कोसळून एका बिबट्याचा घटनास्थळीच करुण अंत झाला. दुसरा बिबट्या जखमी झाला होता. त्यानंतर आता बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबटचा मृत्यू झाला. वन्यजीवांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

