नागपूर : वन्यजीव संवर्धनाची व्याप्ती केवळ अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांपुरती मर्यादित न ठेवता वन्यजीवांच्या हालचालींसाठी महत्त्वाच्या मार्गिका आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील अधिवासांच्या संवर्धनावर भर देण्याचे निर्देश वन विभागाला देण्यात आले आहेत. यंदाचा वन्यजीव सप्ताह २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान साजरा केला जाणार असून, ‘कनेक्टिंग हॅबिटॅट्स, थ्रायव्हिंग वाइल्डलाइफ’ ही यंदाची संकल्पना आहे.
वन्यजीव मार्गिकांवर विशेष भर
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वन्यजीवांच्या हालचालींच्या मार्गिका असलेल्या भागांत विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. जंगलांचे तुकडीकरण झाल्यामुळे वन्यजीवांच्या हालचालींवर होणारा परिणाम, एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वनक्षेत्रात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक मार्गिका आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील अधिवासांचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाघ, बिबट्या, हत्ती, लांडगा आदी वन्यजीवांच्या स्थानिक हालचालींची उदाहरणे देऊन मार्गिकांचे महत्त्व स्पष्ट केले जाणार आहे.
कार्यक्रम कार्यालयाबाहेर, प्रत्यक्ष क्षेत्रात
वन्यजीव सप्ताह केवळ औपचारिक उद्घाटनापुरता मर्यादित न ठेवता वन विभाग, वनपरिक्षेत्र, संरक्षित क्षेत्र, व्याघ्र प्रकल्प, बफर क्षेत्र, गाव तसेच शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवर कार्यक्रम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक वनपरिक्षेत्रात किमान एक अर्थपूर्ण वन्यजीव संवर्धन, निसर्ग शिक्षण किंवा जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. विद्यार्थी, युवक आणि शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी व्याख्याने, निबंध, प्रश्नमंजुषा, चित्रकला, पक्षीनिरीक्षण आणि निसर्गभ्रमंतीसारखे उपक्रम घेण्यात येतील.
अधिवास पुनर्स्थापनेचे उपक्रम
वन्यजीवांच्या अधिवासांचे संवर्धन आणि पुनर्स्थापनेच्या दृष्टीने परकीय तण काढणे, वन्यजीव अधिवास व पाणथळ क्षेत्रांची स्वच्छता आणि गवताळ प्रदेशांबाबत जनजागृती असे उपक्रमही राबविता येणार आहेत. मात्र, अशा उपक्रमांमुळे वन्यजीवांना किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
संघर्षग्रस्त गावांमध्ये जनजागृती
मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना असलेल्या भागांमध्ये ग्रामस्तरावर विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. वन्यप्राणी दिसल्यास सुरक्षित वर्तन, वन्यजीवांच्या हालचालीची तातडीने माहिती देणे, वन्यप्राण्यांभोवती गर्दी न करणे आणि प्रतिशोधात्मक कारवाई टाळणे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पशुधन व पिकांचे संरक्षण, जलद प्रतिसाद पथकांची भूमिका आणि शासकीय नुकसानभरपाईच्या तरतुदींचीही माहिती देण्यात येणार आहे.
कोअर-बफर क्षेत्रातही कार्यक्रम
राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर आणि बफर क्षेत्रात कार्यक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक व्याघ्र प्रकल्पात किमान एका प्रमुख कार्यक्रमाचा केंद्रबिंदू वन्यजीव मार्गिका, अधिवास जोडणी, अधिवास संवर्धन आणि व्याघ्र संवर्धनातील स्थानिक समुदायांचा सहभाग हा असेल. अधिवास पुनर्स्थापना, गावांचे स्वेच्छेने पुनर्वसन, संघर्ष निवारण, स्थानिक उपजीविका आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वन्यजीव निरीक्षण यासारखे यशस्वी उपक्रमही सप्ताहात मांडले जाणार आहेत.
शिकारी, बेकायदा व्यापाराविरोधातही जागृती
वन्यजीव गुन्हे आणि बेकायदा वन्यजीव व्यापाराविरोधातही जनजागृती केली जाणार आहे. वन्यजीवांना मिळालेले कायदेशीर संरक्षण, शिकारीला प्रतिबंध, वन्यजीवांच्या अवयवांची किंवा वस्तूंची बेकायदा मालकी आणि वन्यजीव गुन्ह्यांची माहिती देण्याबाबत नागरिकांना जागरूक करण्यात येणार आहे. प्रत्येक वन विभाग आणि व्याघ्र प्रकल्पाने स्थानिक पातळीवरील किमान एका यशस्वी संवर्धन उपक्रमाचे सादरीकरण करण्याचेही निर्देश आहेत.
वन्यजीव सप्ताहातील प्रमुख कार्यक्रमांची नोंद, सहभागींची संख्या, संवर्धनाचा संदेश आणि छायाचित्रांसह अहवाल १२ ऑक्टोबरपर्यंत सादर करावा लागणार आहे. सप्ताहातील सर्व कार्यक्रम पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित करण्याच्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
