विधान परिषद निवडणूक

नागपूर : विजयासाठी लागणारी पुरेश्ी मतसंख्या पक्षाकडे नसल्याने उमेदवारच न देण्याची आत्मघाती खेळी मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत काँग्रेसने खेळल्यास याबाबतीत कागदावर तरी भक्कम स्थितीत असलेल्या भारतीय जनता पक्षाला नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील त्यांची जागा कायम राखणे जड जाणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.

नागपूर स्थानिक प्राधिकारी संस्था हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण नेत्यांच्या मतभेदांमुळे सध्या तो भाजपकडे गेला. मागील निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारच न दिल्याने भाजपचे गिरीश व्यास बिनविरोध निवडून आले. जिंकण्यासाठी आवश्यक मते नसल्याने त्यावेळी काँग्रेसकडून कोणीच लढण्यास तयार नव्हते. ऐनवेळी एकाने अर्ज दाखल के ला होता. पण त्यानेही माघार घेतल्याने काँग्रेसवर नामुष्की  ओढवली होती.

सहा वर्षानंतरही या मतदारसंघातील चित्र फारसे बदलले नाही. एकूण ६१४ मतदारांपैकी जिंकण्यासाठी आवश्यक निम्म्याहून अधिक मतदार भाजपकडे असल्याचा दावा पक्षाचे नेते करतात. सर्वाधिक मतदार असलेली महापालिका भाजपकडे आहे. १४ पैकी निम्म्याहून अधिक पालिकांमध्ये भाजप भक्कम स्थितीत आहे. काँग्रेसकडे जिल्हा परिषद, काही नगरपालिका आहेत. असे असले तरी पदवीधर मतदारसंघ आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने मिळवलेला एक हाती विजय हा पक्षात उत्साह भरणारा ठरला आहे. मात्र तरीही विजयासाठी लागणारी मानसिकता निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुक नेत्यांमध्ये नाही.

मर्यादित मतदारसंख्या हे या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रिंगणातील  उमेदवार, त्याची पैसे खर्च करण्याची क्षमता, निवडणूक व्यवस्थापन आणि जात हे चार घटक या निवडणुकीत महत्त्वाचे ठरतात. आजवरच्या निवडणुकीतील निकालावरून हे स्पष्ट झाले आहे.

कागदावर कोणाकडे किती मतांचे संख्याबळ आहे यापेक्षा मतदान कसे होते हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे सध्या भाजपकडे जरी मतदारांचे भक्कम पाठबळ असले तरी केवळ त्या आधारावर या पक्षाकडून विजयाचा दावा करणे जरा धाडसी वाटते. या पार्श्वभूमीवर निवडणूक रिंगणातील  प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार कोण हे ठरल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विद्यमान आमदार गिरीश व्यास हे लढण्यास इच्छुक नसल्याने भाजपला नवा चेहरा द्यावा लागणार आहे. तो ठरवताना ओबीसींना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. शिवाय भक्कम आर्थिक पाठबळ हासुद्धा मुद्दा आहेच. सध्या तरी या निकषात बसणारी दोन नावे चर्चेत आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक विक्की कुकरेजा यांचा त्यात समावेश होतो. बावनकुळे ओबीसी आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे त्यांचा सर्वपक्षीय संपर्क आहे. शिवाय निवडणूक जिंकण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळही त्यांच्याकडे आहे. कुकरेजा हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

काँग्रेसमध्ये इच्छुक म्हणून स्वत:चे नाव कोणीही पुढे करीत नाही.  पक्ष सांगेल तर विचार करू, अशा स्वरूपाच्याच प्रतिक्रिया नेत्यांकडून येतात. माजी मंत्री राजेंद्र मुळक हे एक नाव चर्चेत आहे. ते ओबीसी आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. याच मतदारसंघातून ते एकदा विजयी झाल्याने त्यांना निवडणुकीचा अनुभवही आहे. उमेदवार ठरवताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्ह्याचे नेते व मंत्री सुनील केदार या दोन नेत्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. विजयासाठी पुरेसे मतबळ नसणे ही काँग्रेसमधील इच्छुकांच्या चिंतेचा विषय आहे. ७० ते ७५ मतांची जुळवाजुळव त्यांना करावी लागणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसकडे दोनमंत्रीपदे आहेत. केदार यांची ग्रामीण राजकारणावर पकड आहे. मात्र पक्षाला गटबाजीचे ग्रहण आहे. पक्षातील दुसरी फळीही उमेदवारीसाठी आग्रही नाही. त्यामुळे काँग्रेसकडूनही ऐनवेळी नवे नाव पुढे येऊ शकते. काँग्रेसने ही निवडणूक गांभीर्याने घेतली नाही तर मागच्या वर्षीप्रमाणेच ही बाब भाजपच्या पथ्यावर पडणारी ठरेल.

सध्या भाजप आणि काँग्रेसच्या पातळीवर उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. दोन दिवस फडणवीस नागपुरात होते. त्याआधी गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात उमेदवारांच्या नावावर प्राथमिक स्वरूपातील चर्चा झाली. मात्र निर्णय पक्षाचे सांसदीय मंडळच घेईल, असे फडवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दुसरीकडे काँग्रेसनेही बैठका घेणे सुरू केले. बुधवारी यासंदर्भात रविभवनात बैठक झाली. केदार आणि मुळक या बैठकीला उपस्थित होते.

शिवसेना, बसपा, गोंडवाणा गणतंत्र पार्टी, विदर्भ माझा पार्टी, बहुजन रिपब्लिकन एकता मंच या पक्षांच्या सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सध्या भाजप व काँग्रेसचे उमेदवार कोण असणार याचीच उत्सुकता आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

या मतदारसंघातून यापूर्वी काँग्रेसचे रमेश गुप्ता, राजेंद्र मुळक, भाजपचे बळवंतराव ढोबळे, सागर मेघे, अशोक मानकर, गिरीश व्यास यांनी प्रतिनिधित्व  केले आहे.

विकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकजुटीने निवडणूक लढल्यास ही जागा काँग्रेसला जिंकता येईल. – राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

उमेदवार ठरवण्याचा अधिकार पक्षाला असतो. याबाबत आपल्याला काहीच कल्पना नाही. मात्र, भाजपची ६५ मते अधिक आहेत. सर्व पक्ष एकत्र आले तरी भाजप ही जागा जिंकणार. – चंद्रशेखर बावनकु ळे, भाजप नेते.