scorecardresearch

कारागृहातील अनागोंदीची चौकशी करणार; अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलकर्णी यांची माहिती,  ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

मध्यवर्ती कारागृहात अनागोंदी कारभार सुरू असून कुख्यात कैद्यांमध्ये टोळीयुद्ध पेटल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित करताच कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात अनागोंदी कारभार सुरू असून कुख्यात कैद्यांमध्ये टोळीयुद्ध पेटल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित करताच कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कारागृहाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी या वृत्ताची दखल घेत, सखोल चौकशी करणार असल्याचे सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कनिष्ठ कारागृह अधिकाऱ्यांनी कुख्यात आणि धनाढय़ कैद्यांकडून चिरीमिरी घेऊन सर्व सुविधा पुरवणे सुरू केले होते. त्यात दोन महिला अधिकारी आघाडीवर आहेत. कारागृहाची सूत्रे महिला अधिकाऱ्यांच्या हाती  असून काही निवडक कैद्यांना मोबाईल, गांजा, मटण-चिकन आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या गैरप्रकाराला काही महिला कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यामुळे महिला अधिकाऱ्यांनी त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले. या गैरप्रकाराबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारी प्रकाशित केले.पुण्यातील अतिरिक्त महासंचालक कार्यालयापर्यंत हे वृत्त पोहचल्याने कारागृह अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. वरिष्ठांच्या कानावर प्रकरण गेल्यामुळे एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने लगेच नागपूर कारागृहातील महिला अधिकाऱ्यांची बाजू लावून धरल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून लगेच चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

‘नाशिक पॅटर्न’ नागपुरात

कारागृहातील काही अधिकाऱ्यांनी कैद्यांकडून वसुलीसाठी ‘नाशिक पॅटर्न’ सुरू केला आहे. वरिष्ठांच्या डोळय़ात धूळफेक करीत तुरुंग अधिकारी कैद्यांना संचित आणि अभिवचन रजा तसेच जामीन मिळण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात पैसे घेतात. याला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवले जाते, अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will investigate prison chaos according additional director general of police kulkarni loksatta report noticed ysh

ताज्या बातम्या