बुलढाणा : कार्यकर्त्याने पाय धुणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांच्यावर चोहीकडून प्रामुख्याने विरोधी पक्ष नेत्यांकडून टीकेचा भडिमार होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम शिंदे, शिवसेनेचे संजय शिरसाट, राष्ट्रवादीचे (अजितदादा पवार गट) अमोल मिटकरी यांनी यावरून घनघोर टीका करीत पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे पटोले हे चोहोबाजूंनी अडचणीत आले असताना त्यांचे पाय धुणारे विजय गुरव देखील चर्चेत आले आहे.

ते नेमके कोण आहेत याबद्धल काँग्रेस, राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तर हे विजय गुरव बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. शेगाव तालुक्यातील कालखेड येथील रहिवासी असलेले गुरव सामाजिक कार्यकर्ते असून नाना पटोले यांना आपले आराध्य मानतात. पश्चिम विदर्भात पटोले कुठेही आले की गुरवही तिथे हमखास राहतात. मंगळवारी ( दि. १९) रात्री उशिरा प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना गाठले.आधी काही बोलण्यास रुची न दाखविणाऱ्या विजय गुरव यांनी काँग्रेस नेते पटोले आपले आराध्य असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण एकदाच नव्हे दहावेळा त्यांचे पाय धुणार असे त्यांनी ठणकावून सांगितले. यामुळे पटोले यांचे पाय धुण्यावरून विरोधकांकडून होणारी टीका अनाठायी असून त्यांनी या विषयावर बोलूच नये असे गुरव यांनी वारंवार सांगितले.

हेही वाचा – धक्कादायक! नागपुरातील उच्चभ्रू परिसर धरमपेठ, मंगळवारीत चिकनगुनियाचा प्रकोप

पटोले पितृतुल्य

‘त्या’ घटनेची पार्श्वभूमी देखील त्यांनी विशद केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा सोमवारी अकोला बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे नियोजित कार्यक्रम होता. त्याच वेळेस शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी ही वाडेगावात मुक्कामी होती. दरम्यान पालखीचे दर्शन घेण्यासाठी पटोले हे चिखलातून त्या ठिकाणी पोहोचले व दर्शन घेतल्यानंतर ते परतत असताना त्यांचे पाय चिखलाने भरले. यामुळे मी पाणी आणून पाय धुण्यासाठी त्यांच्या पायावर पाणी टाकले. यात काय गैर आहे ? पटोले हे माझ्या वडिलांसमान असून ते माझे दैवत आहेत, मी माझ्या दैवतासाठी एक वेळ नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेल! त्यामुळे या विषयाला घेऊन आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट आणि आमदार राम कदम यांच्याकडून नानाभाऊ पटोले यांच्यावर केले जाणारे आरोप थांबवावे व माझे कुटुंबीय व माझ्या नावाने आपल्या राजकारणाची पोळी शिकू नये, असे आवाहन देखील विजय गुरव यांनी केले आहे.

हेही वाचा – नागपूर : गरोदर महिलांच्या तपासणीत १० हजारांवर सिकलसेल वाहकांची नोंद

कोण आहेत गुरव?

पटोलेंचे कथीतरित्या पाय धुणारा कार्यकर्ता हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कालखेड गावाचा विजय गुरव आहे. तो पटोलेंचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा या भागात पटोले आले की हा कार्यकर्ता आवर्जून त्यांच्या सेवेत असतो अशीही माहिती प्राप्त झाली आहे.