नागपूर : राज्यात मार्चच्या मध्यान्हपर्यंत थंडी राहणार असा जो अंदाज वर्तविण्यात आला होता, तो आता खरा ठरू लागल्याचे चित्र आहे. थंडीने जवळजवळ काढता पाय घेतला असून उन्हाळ्याची चाहूल लागणारे उन्ह जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरूवातीपासूनच महाराष्ट्रत गारठा कमी होत असल्याचे जाणवू लागले असून कोकण किनारपट्टीवरील वातावरण दमट होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईमध्ये आज दिवसभार वातावरण उष्ण राहील असा अंदाज हवामान विभागाने काल वर्तवला होता. काही ठिकाणी तर पारा ३४ अंश सेल्सियसपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. विदर्भात दिवसा उन्ह आणि रात्री हलकी थंडी आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रासह कोकणातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात हवामान स्थिर राहून फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील हवामानात हळूहळू स्थिरता येताना दिसत आहे. मागील काही दिवसांच्या बदलत्या वातावरणानंतर आता राज्यात ढगाळ वातावरण निवळत असून कोरडे हवामान अनुभवास येत आहे.

चार फेब्रुवारीला राज्यातील कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाही, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. थंडीचा प्रभाव काही भागांत सकाळपुरता मर्यादित राहणार असून दिवसा उकाडा वाढलेला जाणवणार आहे. कोकण किनारपट्टीवर आज हवामान प्रामुख्याने स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळच्या वेळेत सौम्य थंडी जाणवेल, मात्र दुपारनंतर उकाडा वाढणार आहे. समुद्रकिनारी भागात दमट वातावरण राहील. आज कोकणात कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज कोरडे आणि स्थिर हवामान राहणार आहे.

 पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर परिसरात सकाळी आणि रात्री थंडी जाणवेल, तर दिवसा तापमानात वाढ होणार आहे. आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार असून उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो.या भागांमध्ये कमाल तापमान ३२ ते ३४ अंश, तर किमान तापमान १६ ते १९ अंश सेल्सिअस राहणार आहे. या भागांमध्ये कमाल तापमान ३३ ते ३५ अंश, तर किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडे राहणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड भागात सकाळच्या वेळेत गारवा जाणवेल, मात्र दुपारनंतर उष्णता वाढणार आहे. विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर परिसरात तापमानात चढउतार दिसून येतील. या भागांमध्ये कमाल तापमान ३३ ते ३५ अंश, तर किमान तापमान १५ ते 1८ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.

एकंदरीत, चार फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे हवामान राहणार असून थंडीचा प्रभाव कमी होत चालल्याचे चित्र आहे. सकाळी गारवा आणि दुपारी वाढणारा उकाडा असा मिश्र अनुभव नागरिकांना येणार आहे. पुढील काही दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच राज्यात उष्णतेचे संकेत दिसत असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.