नागपूर : सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा दहा दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाली. तर आज, उद्यापासून राजकीय नेतेमंडळी, मंत्री, आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक, कार्यालयीन कर्मचारी असे सर्वच दाखल होतील. मात्र, या अधिवेशनकाळात जंगल सफारीवर या राजकीय नेतेमंडळी व त्यांची माणसे हक्क दाखवत असल्याने सर्वसामान्य पर्यटकांची अडवणूक होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आधीच जंगलसफारीवर या मंडळींनी हक्क दाखवल्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.राज्यात ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर आणि सह्याद्री असे पाच व्याघ्रप्रकल्प आहेत. यातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्प सोडला तर पाचही व्याघ्रप्रकल्प विदर्भात आहेत आणि या सर्व व्याघ्रप्रकल्पात जाण्यासाठी नागपूर हे एकच प्रवेशद्वार आहे. त्यामुळे नागपूरला ‘व्याघ्र राजधानी’ असा दर्जा देण्यात आला आहे.
अधिवेशन अवघ्या काही तासांवर आले असताना ताडोबा, पेंच या व्याघ्रप्रकल्पांसह उमरेड-कऱ्हांडला या अभयारण्यातील सफारी पुढील आठ दिवसांसाठी जवळजवळ ‘फुल्ल’ झाली आहे. अधिवेशनासाठी आलेली ही राजकीय मंडळी व त्यांच्यासोबत असलेली इतर मंडळी विदर्भात सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनासाठी आतूर असतात. राजकीय वशिला असल्याने त्यांना सहज प्रवेशही मिळतो. त्यामुळे ताडोबा, पेंच व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील कोअर क्षेत्रातील सफारीवर आधीच त्यांनी आपला हक्क निश्चित केला आहे.
पेंच व्याघ्रप्रकल्पातील खुर्सापार तसेच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला व गोठणगाव या प्रवेशद्वाराचे आरक्षण ‘फुल्ल’ झाले आहे. गेल्या वर्षीपासून हिवाळी अधिवेशन आठच दिवसांचे होत आहे. आतापर्यंत साधारण १५ दिवस तरी हिवाळी अधिवेशन राहात असल्याने, हे १५ दिवस सर्वसामान्य पर्यटकांची अडवणूक व्हायची. आता आठच दिवस असले तरीही हा आठ दिवस सर्वसामान्य पर्यटकांची मात्र अडवणूकच होणार आहे.
अधिवेशनकाळात सर्व पक्ष्यांच्या नेत्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा ओढा विदर्भातील व्याघ्रप्रकल्पांकडे असतो. विदर्भातील हिवाळी अधिवेशन म्हणजे त्यांच्यासाठी पर्यटनाची संधी असेही बोलले जाते. या व्याघ्रप्रकल्प,अभयारण्यात त्यांचाच वरचष्मा असतो. सध्या नागपूरपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य आहे. या अभयारण्यातील गोठणगाव परिसरात ‘एफ-टू’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांचा वावर आहे. सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून गोठणगाव ‘फुल्ल’ आहे. अधिवेशनासाठी आलेल्या राजकीय मंडळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सर्वाधिक ओढा याच अभयारण्याकडे आहे. त्यामुळे किमान दहा दिवस तरी सर्वसामान्य पर्यटकांसाठी जंगल सफारी थांबलेली आहे.
