नागपुरात एका तरुणीनं तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर पोलिसांनी कर्मचारी कामाला लावले. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तब्बल १ हजारहून अधिक पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र तपासाअंती समोर आलेल्या माहितीनं पोलीसही चक्रावले.

सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास तरुणीने सामुहिक बलात्कार झाल्याची तक्रार कळमना पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी शहरभरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर तरुणीने बलात्काराची बनावट कथा रचली होती, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले.

“चिखली परिसरात एका निर्जन ठिकाणी दोन नराधमांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला होता. तरुणी सकाळी रामदासपेठ परिसरात म्युझिक क्लासला जात होती. त्यावेळी दोन आरोपी एका पांढऱ्या रंगाच्या व्हॅनमध्ये आले आणि त्यांना बुटीबोरीचा रस्ता विचारला. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने तरुणीला व्हॅनमध्ये खेचले आणि तोंड कापडाने झाकले. आरोपींनी एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला,” अशी तक्रार तरुणीने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

तक्रार प्राप्त होताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कळमना पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी व इतर वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचले.

शहरातील सीसीटीव्ही फुटेज, व्हॅन वाहनांची तपासणी करण्यासाठी आणि तरुणीच्या मित्रांची चौकशी करण्यासाठी तब्बल १ हजारहून अधिक पोलीस कर्मचार्‍यांची ४० विशेष पथके तयार करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “सीसीटीव्ही फुटेजवरून असे आढळून आले की महिला सकाळी ९:५० वाजता व्हेरायटी चौकात बसमधून खाली उतरली, सकाळी १० वाजता झाशी राणी चौकाकडे चालत गेली, १०.१५ वाजता तिने आनंद टॉकीज चौकातून ऑटो रिक्षा पकडली. आणि सकाळी १०.२५ ला मेयो हॉस्पिटलमध्ये उतरली. यानंतर ती दुसरी ऑटो रिक्षा घेऊन सकाळी १०.५४ वाजता चिखली चौकात उतरली. पेट्रोल पंपावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही महिला सकाळी ११.०४ वाजता कळमना पोलीस स्टेशनच्या दिशेने चालत येताना दिसली,” असे पोलिसांनी सांगितले.

तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले. सहा तासांहून अधिक वेळ तपास आणि ५० हून अधिक लोकांची चौकशी केल्यानंतर पोलीस या निष्कर्षावर पोहोचले की या तरुणीने सामूहिक बलात्काराची कथा रचली होती. दरम्यान, पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने प्रियकराशी लग्न करण्यासाठी हा बनाव रचल्याची कबुली दिली.