नागपूर : जैविक भेद सोडल्यास पुरुष आणि महिला प्रत्येक बाबतीत समान आहेत. उलट पुरुषांच्या तुलनेत महिलाच अधिक सक्षम आहेत. त्यामुळे त्यांना मार्गदर्शनाची गरज नाही. पण, महिला उत्थानाच्या मुद्यावर पुरुषांनाच प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

संघमित्रा सेवा प्रतिष्ठानच्या सेविका प्रकाशनच्यावतीने ‘अखिल भारतीय महिला चरित्र कोश प्रथम खंड- प्राचीन भारत’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते बुधवारी चिटणवीस सेंटरमध्ये झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का उपस्थित होत्या.

यावेळी डॉ. भागवत म्हणाले, भारतात पुरुष श्रेष्ठ की महिला हा वादच नाही. ते दोघेही एका रथाच्या दोन चाकांप्रमाणे आहेत. आपली भारतीय परंपरा श्रेष्ठ आहे. भारतीय कुटुंब व्यवस्था, विवाह संस्थांना इंग्रज तुच्छ मानत होते. तेच आज या व्यवस्थेचा अभ्यास करीत आहेत. महिला उत्थानासाठी पुरुषांना प्रयत्न करण्याची गरज नाही. कारण, त्या मुळातच सक्षम आहेत. त्यांना मार्गदर्श करणे हे पुरुषांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा मार्ग निवडू द्या. त्यांना इतके दिवस आपण बंदिस्त करून ठेवले. आता त्यांना प्रबुद्ध, सशक्त होऊ द्या, असे सांगून डॉ. भागवत यांनी महिलांबाबत पुरुषांनी त्यांच्या दृष्टिकोनात बदल करावा, असे आवाहन केले.

महिला सक्षमीकरणाची सुरुवात घरापासूनच करा

एकीकडे आपण महिलेला जगतजननी मानतो तर दुसरीकडे आपण तिला दासी बनवून ठेवतो. या मानसिकतेचा त्याग करून तिला बरोबरीचे स्थान द्यावे. तिच्या कर्तृत्वाला संधी मिळेल असे वातावरण निर्माण करावे व याची सुरुवात आपल्या घरापासून करावी, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.