दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे महिला त्रस्त झाल्या आहेत, महागाईमुळे प्रत्येक गृहिणीचे बजेट कोलमडले आहे, दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर पाच टक्के ‘जीएसटी’ वाढवल्या जात आहे, स्वयंपाकाचा गॅस असो की दुचाकीचे इंधन, सर्वच महागले आहे. महागाई तातडीने नियंत्रणात आणा, अन्यथा महिला महागाईविरोधात बेलने घेऊन रस्त्यावर उतरतील, असा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका व शहर महिला काँग्रेसने थेट पंतप्रधान कार्यालयास पाठविलेल्या पत्रातून दिला आहे.

महागाईत सातत्याने वाढ होत असल्याने महिला काँग्रेसने गृहिणींना होणारा संताप पत्रात लिहून पंतप्रधानांच्या नावाने ते पत्रपेटीत टाकले. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे व जिल्हाध्यक्षा मंगला पाटील यांच्या सूचनेनुसार डाक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.