अमरावती : रस्त्यावर दुचाकीने जाणाऱ्या एका ६० वर्षीय व्यक्तीला एका महिलेने आपल्या दुचाकीमधील पेट्रोल संपले म्हणून ‘लिफ्ट’ मागितली. त्यानंतर महिलेने उधार म्हणून ४०० रुपये घेतले. रक्कम परत घेण्यासाठी महिलेने संबंधित व्यक्तीला आपल्या सदनिकेवर बोलावले. तेथे अन्य दोन महिलांसह तिघींनी त्यांना मारहाण केली. बलात्काराच्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत ६० हजार रुपयांची खंडणी मागितली. ही धक्कादायक घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

नंदकिशोर जगन्नाथ भडांगे (६०) रा. व्हीएमव्ही मार्ग असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. भडांगे हे १७ ऑगस्ट रोजी दुचाकीने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या मार्गाने जात होते. यावेळी एका महिलेने त्यांना थांबवून वाहनातील पेट्रोल संपल्याचे सांगून १०० रुपये मागितले. त्यानंतर माझ्या पतीचे निधन झाले आहे. माझे किराणा दुकान आहे, असे सांगून तिने भडांगे यांना आणखी ३०० रुपये मागितले. भडांगे यांनी महिलेला गाडगेनगर ठाण्यासमोर सोडल्यावर तिने त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. मी फोन करून तुम्हाला पैसे परत करेल, असे ती म्हणाली.

हेही वाचा : वर्धा : ‘एटीएम’ फोडून बावीस लाखांची रोकड लंपास

त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी या महिलेने भडांगे यांना मोबाईलवर संपर्क साधून नवसारी परिसरातील एका सदनिकेवर बोलावले. भडांगे तिथे गेल्यावर महिलेने दरवाजा आतून बंद करून घेतला. माझी बहीण १० मिनिटांत पैसे घेऊन येत आहे, असे म्हणून महिलेने भडांगे यांना बसवून ठेवले. काही वेळाने दोन महिला त्या ठिकाणी आल्या. त्यांनी आत येताच दरवाजा बंद केला. तीनही महिलांनी दरवाजा न उघडता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत ६० हजार रुपयांची खंडणी मागितली. रक्कम न दिल्यास बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांना बाथरूममध्ये डांबण्यात आले.

हेही वाचा : नागपूर : राजकीय टीका केल्यास कलावंत, वाहिनी सगळेच अडचणीत – समीर चौघुलेंची वास्तवदर्शी प्रतिक्रिया

यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी भडांगे यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे महिलांनी त्यांना बाहेर काढले. पैशांसाठी तीन महिन्यांची मुदत देतो, असे म्हणून महिलांनी भडांगे यांची सुटका केली. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी त्यापैकी दोन महिला भडांगे यांच्या घरी गेल्या. त्यांनी त्यांच्या पत्नीसही मारहाण केली. या प्रकरणी भडांगे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी तीनही महिलांविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.