कारंजा तालुक्यातील नागझरी वन शिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात एक महिला जागीच ठार झाली असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.
तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी सुशीला भाऊराव वंडारी (वय ६०) व अवीता रवींद्र वंडारी (वय २७) या दोघी नागझरी क्षेत्रातील हनुमान मंदिराजवळ गेल्या होत्या. यावेळी या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने दोघींवर हल्ला केला.

वाघाने केलेल्या हल्ल्यात सुशील यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या अवीतावर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रथामिक उपचारानंतर अवीताची प्रकृती लक्षात घेत पुढील उपचारांसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.

वाघाने हल्ला केल्याची माहिती आका भलावी या युवकास कळताच त्याने वन विभागास याची माहिती दिली. या भागात पाच मेपासून तेंदू संकलन सुरू झाले आहे. आज म्हणजेच २४ मे २०२२ रोजी तेंदू संकलनाचा शेवटचा दिवस होता. आज तेरा लोक जंगलात गेले होते. त्यापैकीच या दोघींवर वाघाने हल्ला केला.

यापूर्वी महादेव चौधरी या शेतकऱ्याच्या कुत्र्यावर वाघाने हल्ला केला होता. यामुळे परिसरात वाघाची चांगलीच दहशत पसरली आहे. शेतीची कामे सुरू असतानाच असे होत असलेले हल्ले शेतकऱ्यांना संकटात टाकणारे ठरत आहे.