‘महिला’ हा शब्द प्रतीक आहे शक्तीचा, सामर्थ्यांचा, संवेदनशीलतेचा..घराघरात सुसंवादाचा पूल बांधणारी जशी स्त्री असते तशीच व्यावसायिक क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय लिहिणारीही स्त्रीच असते. समाजाने आखून दिलेली कप्पेबंद चौकट ओलांडून आज महिलांनी थेट यशाच्या क्षितिजाला गवसणी घातली आहे. शहरातील अशाच काही कर्तृत्ववान महिलांची ही ओळख..खास महिला दिनाच्या निमित्ताने! यात जशा पोलिसांचा गणवेश धारण करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आहेत तशाच आपल्या कौशल्याने शासनाच्या सेवा समाजापर्यंत उपयुक्त पद्धतीने पोहोचविणाऱ्या शासकीय कर्मचारीही आहेत.

‘तेव्हा’ खचले असते तर..?

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

पोलिसांच्या वर्दीचे आकर्षण आणि ती वर्दी अंगावर चढवण्याआधी होणारे प्रशिक्षण या दोन्हीत प्रचंड अंतर. मला अजूनही आठवते तो पाणी साचलेल्या डबक्यात हिरवळीचे किडे असताना त्यात लोळायला लावले. एक क्षण मानसिकदृष्टय़ा आपण खचतो की काय असे वाटत असताना, त्या क्षणाला ठेवलेल्या संयमानेच एका पोलीस ठाण्याची धुरा सांभाळण्याइतपत विश्वास मिळवता आला. तोच संयम रेल्वेरुळावर कटलेल्या युवकाच्या घरच्यांना हा निरोप देताना आला. कारण पत्नी अवघ्या १२ दिवसांची बाळंतीण. त्या इवल्याशा जीवाला पाहताच डोळय़ाच्या कडा पाणावल्या. दारात पोलीस दिसल्याने पत्नी कावऱ्याबावऱ्या नजरेने बघू लागली. शेवटी मनावर संयम ठेवत तो प्रसंग हाताळल्याचा अनुभव ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी सांगितला.

– वैजयंती मांडवधरे, ठाणेदार, मानकापूर

अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजे!

तरुणाईच्या उंबरठय़ावर असणाऱ्या मुलामुलींची अनेक प्रकरणे येतात, तेव्हा ते अतिशय संवेदनशीलतेने हाताळावी लागतात. यात ती मुलेच नाही तर आईवडिलांना देखील त्याच संवेदनशीलतेने समजवावे लागते. ही प्रकरणे हाताळताना मग आपल्या घरचा विचार येतो. आपणही आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. आपली मुलेही याच मार्गावर तर नाही जाणार ना, ही एक भीती असते. कारण कित्येकदा अशा प्रकरणात आई-वडिलांचाही तेवढाच दोष असतो. तर काही प्रकरणात मुलांचा समंजसपणा देखील पाहायला मिळाला आहे. अन्याय कुणाविरुद्धही असो, अगदी आईवर होणारा अन्याय असला तरी ती मुले निर्भीडपणे तक्रार करायला समोर येतात, असा अनुभव ठाणेदार शुभांगी देशमुख यांनी सांगितला.

– शुभांगी देशमुख, ठाणेदार, बजाजनगर.

महिला ‘पोलीस’ दीदी झाली!

पोलीस ठाण्यात तक्रारी घेऊन येणारे बरेचदा खोटी माहिती देतात. अशावेळी त्यांच्याकडून सत्य वदवून घेताना आम्हालाही मुखवटा चढवावा लागतो. अवघ्या १७ वर्षांच्या एका मुलीने बाळाला जन्म दिला. या प्रकरणात वय लपवून खोटी माहिती देण्याचा प्रयत्न झाला. अशी तीन-चार प्रकरणे आमच्याकडे आली. आम्ही आता पोलीस दीदी म्हणून एक उपक्रम सुरू केला आहे, ज्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शाळा, महाविद्यालये, वस्त्यांमध्ये आम्ही जाऊन समुपदेशन करतो. ज्याला आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे. असा अनुभव ललिता तोडासे यांनी सांगितला.

– ललिता तोडासे, ठाणेदार, वाडी.

अन् ‘बाईपणानेच’ गुंता सोडवला!

महिला त्या देखील आणि महिला आम्ही देखील, पण यात एवढे अंतर ! विश्वासच बसायला तयार नाही. वेश्यावस्तीतील त्यांचे जे जगणे पाहिले आणि कुणाला जगण्यासाठी तर कुणाला जबरीने या व्यवसायात का पडावे लागावे, हा प्रश्नांचा गुंता घरी परतल्यानंतरही सुटेना. कित्येकदा ‘रेस्क्यू ऑपरेशन’ दरम्यान या वस्तीत पाऊल ठेवावे लागते. या वस्तीतल्या महिलांना या डबक्यातून बाहेर काढताना अनेकदा आमच्यातले बाईपणच कामात येते. अनेक ‘रेस्क्यू ऑपरेशन’ हाताळणाऱ्या ठाणेदार विद्या जाधव यांनी हा अनुभव सांगितला.

– विद्या जाधव, ठाणेदार, प्रतापनगर.

तक्रार करायला लावणे हेही कौशल्यच!

शारीरिक अत्याचाराचे प्रकरण हाताळताना एक स्त्री असण्याचा खूप फायदा होतो. कारण अत्याचार झालेली तरुणी असू देत वा वृद्धा. शारीरिक अत्याचाराची झळ थेट तिच्या मेंदूवर कोरली गेली असते. त्यातून तिला बाहेर काढणे आणि तद्वतच झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार करायला लावणे हे एक कौशल्यच. काही दिवसांपूर्वीच एका मुलाने त्याच्या आईवर शारीरिक अत्याचार केला. या प्रकरणात त्या आईला मुलाविरुद्ध तक्रार देण्यासाठी तयार करणे आणि कधी स्वप्नातही विचार केला नसताना झालेल्या या अत्याचाराच्या मानसिक जखमातून बाहेर काढणे कठीण होते. प्रयत्नांती ते तडीस नेले आणि त्या मुलाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. ठाणेदार आशालता खापरे यांनी हा अनुभव सांगितला.

– आशालता खापरे, ठाणेदार, वाठोडा.

माझ्या लग्नात मीच उशिरा पोहोचले!

दोन लहान मुले आणि ती देखील जुळी. त्यातही आम्ही नवरा-बायको नोकरीवर. अशावेळी त्यांना सांभाळून नोकरीवर जाणे म्हणजे तारेवरची कसरतच. नवरा करिअरिस्टिक. करिअरला कायम प्राधान्य देणारा आणि त्यामुळेच खरे तर मी माझे करिअर घडवू शकले. आपल्या करिअरला दिशा देणारा आपला नवराच, हे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक गौरी मराठे पंडित यांनी अगदी प्रांजळपणे कबूल केले. वकिलीचे शिक्षण घेत असताना काही मैत्रिणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. त्यांच्याकडूनच ही तयारी करवून घेणाऱ्या चाणाक्य परिवार मंडळाची माहिती मिळाली. वकिलीच्या मार्गावर शिक्कामोर्तब झाले असताना चाणाक्य परिवाराशी सूर जुळले. मग केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि तिथेच शिकवायलाही सुरुवात केली. माझा नवरा चिन्मय पंडितची ओळख तिथेच झाली. स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतीचा दिवस ठरला आणि त्याचदरम्यान लग्नगाठ देखील पक्की झाली होती. लग्नाच्या दिवशी बरेचदा नवरदेवाकडील मंडळी उशिरा येतात, पण माझ्या लग्नात मीच उशिरा पोहोचले. लग्नानंतरही ही कसरत संपली नाही, कारण जुळी मुले झाली. मुले लहान असल्याने नोकरी टिकवणे हे खूप मोठे आव्हान होते, पण मैत्रिणी, कुटुंबीयांच्या साथीने ते सहजपणे पेलता आले. पती पोलीस विभागात असल्याने तेही तेवढेच व्यस्त, पण परस्पर सामंजस्याने आम्ही जमेल तसा वेळ मुलांसाठी आणि कुटुंबासाठी देण्याचा प्रयत्न करतो. हा परस्पर सामंजस्याचा धागा गुंफता आला तर महिलाही त्यांचे करिअर घडवू शकतात.                                  

– गौरी मराठे पंडित, उपसंचालक, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र.

तारेवरच्या कसरतीतही वेगळाच आनंद!

मी सरकारी सेवेत यावं ही वडिलांचीच इच्छा होती. चौथ्या वर्गात असताना वेळेत अभ्यास पूर्ण न केल्याने शिक्षक रागावले. आपल्यामुळे शिक्षकांना त्रास झाल्याचे जाणवले आणि त्याच दिवसापासून आपल्याकडून कोणाला त्रास होऊ नये हे मनात निश्चित केले. सरकारी सेवेत सुरू झाल्यानंतर याच भावनेने कामाला सुरुवात केली. कोणतेही काम प्रलंबित ठेवायचे नाही, विशेषत: हे काम सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित असेल तर तातडीने हातावेगळे करायचे ठरवले. साधा दाखला जरी नागरिकांना मिळाला तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकते. हे पाहूनच केलेल्या कामाचे समाधान मिळते आणि आनंदही होतो. तो मोठा असतो. निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांचे हे मनोगत. अधिकारी म्हणून काम करताना येणारे अनुभव, कार्यालय आणि कुटंब या दोन्ही पातळीवर काम करताना करावी लागणारी तारेवरची कसरत याविषयी भरभरून बोलताना मीनल कळसकर यांनी कौटुंबिक पातळीवर थोडी तडजोड करावी लागते. मुलांकडे दुर्लक्ष होते, हे अगदी सहजपणे मान्य केले, पण त्याचवेळी आजतागायत काम करताना अडचणी कधी डोकावल्याच नाहीत, कारण कुटुंबीयांनी वेळोवेळी सांभाळून घेतल्याचे अभिमानाने सांगितले. सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर महाबळेश्वरची पहिली महिला तहसीलदार म्हणून काम करण्याचा आलेला अनुभव त्यांनी सांगितला. आता त्या उपराजधानीत निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी आहेत. सरकारी अधिकारी म्हणून सर्वसामान्यांचे काम करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिवसभराचा थकवा मिटवतो. अर्थातच महिला म्हणून काम करताना ही तारेवरची कसरत होते, हे देखील त्यांनी प्रांजळपणे सांगितले.

– मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा.

मध्यरात्री खणखणतो भ्रमणध्वनी!

चार वर्षांपूर्वी अजनी रेल्वेस्थानक पूर्णपणे महिलांच्या हातात देण्यात आले. हे स्थानक रस्त्यालगत असून चारही बाजूने खुले आहे. त्यामुळे रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार येथेच जास्त दिसून येतात. अर्थातच या घटना घडल्यानंतर वैद्यकीय मदतीसाठी धावाधाव आणि त्याहीपेक्षा या मार्गावरून येणाऱ्या इतर गाडय़ांसाठी मार्ग मोकळा करून देणे ही प्राथमिकता असते. रेल्वेखाली येऊन आत्महत्या, या घटना खूप तणावपूर्ण असतात. पुरुष एकदाचे ते हाताळून घेतात, पण एक महिला म्हणून या घटना हाताळताना खूप घाबरून जात होते. आता आम्ही सर्व महिला यातून सावरायला शिकलो आहे. अजनी रेल्वेस्थानकाच्या व्यवस्थापक माधुरी चौधरी यांनी त्यांच्या अनुभवाला वाट मोकळी करून दिली. रेल्वेखाली येणाऱ्या व्यक्तीची थोडीही हालचाल जाणवत असेल तर आधी त्याला वैद्यकीय मदत मिळवून देत त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही धावपळ करतो. प्रत्येक सेकंदागणिक हालचाली सुरूच असतात. वाहनतळ असो, वाहतूक कोंडी किंवा खाद्यपदार्थ विक्रेते, त्या प्रत्येकाला वेगवेगळय़ा पद्धतीने हाताळावे लागते आणि मग आमची दमछाक होते. प्रवाशांबाबतचा अनुभव तर आणखीच वेगळा. आपल्या व्यवस्थेत महिलेने पुरुषावर आवाज चढवला तर ते समोरच्याला सहनच होत नाही. मग ती महिला अधिकारी का असेना. अशावेळी प्रवाशांनाही वेगळय़ा पद्धतीने हाताळावे लागते. स्थानकावर काही अघटित झाले तर ती जबाबदारी माझीच. कित्येकदा रात्री दीड, दोन वाजता भ्रमणध्वनी खणखणला की तसेच उठून जावे लागते. मुले लहान होती तेव्हा अक्षरश: तारेवरची कसरत होत होती. आता ती समजदार झाली आणि कुटुंबाने सुद्धा आता ‘हिची कामाची पद्धतच अशी’ असे म्हणून स्वीकारले आहे.  

    – माधुरी चौधरी, व्यवस्थापक, अजनी रेल्वेस्थानक.

कोंडी फुटली, मार्ग दिसला!

सरकारी सेवेत महिला अधिकारी रुजू होते तेव्हा बरेचदा तिची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो. सुरुवातीला तो माझ्याबाबतीतही झाला. पण अनुभवाअंती शहाणपण येते, असे म्हणतात ना, अगदी तसेच या कोंडीतून बाहेर पडण्याचे मार्गही सापडत गेले. कृषी क्षेत्रात महिला तशा कमीच. मी रुजू झाले तेव्हाही ती संख्या कमीच होती. महिला प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन काम करू शकतील का? असे प्रश्न विचारले जात होते. पण तोंडाने नाही तर कामातून त्याची उत्तरे दिली आणि मग प्रश्नांची ही सरबत्ती संपली. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेल्या डॉ.अर्चना कडू यांनी ठरवून कृषी विषयात बीएस्सी, एस्स्सी आणि पीएचडी केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कृषी खात्यात थेट वर्ग एकच्या अधिकारी म्हणून सेवा सुरू केली. कृषी क्षेत्रात आता मोठय़ा संख्येने महिला सहभागी होत आहेत. प्रत्यक्ष शेती करण्यात ग्रामीण महिलांचे योगदान अधिक आहे. तरीही त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही. महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे. त्याचे चांगले सकारात्मक परिणाम मिळतील. महिला शिक्षित आहेत, त्यांना विविध विषयाचे ज्ञान आहे, मात्र त्यांचा सल्ला घेणे टाळले जाते. सरकारी नोकरीत असताना अनेकदा कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले आहे. कामाच्या व्यापामुळे मुलांची नाराजी ओढवून घेतली आहे. दरम्यान, करोनाने मात्र मुलांची ही नाराजी दूर करण्याची संधी दिली. इतकी वर्षे वर्ष झाली तरी अनेक सरकारी  कार्यालयात अजूनही महिलांसाठी वेगळी स्वच्छतागृहे नाहीत, जी असणे आवश्यक आहे. समानतेची गोष्ट आपण सर्वच जण करतो. पण ती मिळते का हे बघण्याचीही गरज आहे, असे मनोगत डॉ. अर्चना कडू यांनी व्यक्त केले.

– डॉ. अर्चना कडू,  प्राचार्य, प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन, प्रशिक्षण संस्था.

पोलीस सेवेतील काही अनुभव असेही..

  •    नाजूक गुन्ह्यांच्या तक्रारी किंवा तपास करताना महिला असण्याचा खूप फायदा होतो. तक्रारदार किंवा पीडित महिला तंतोतंत माहिती सांगत असल्याने तपास सोपा होतो. त्याच ठिकाणी पुरुष अधिकारी असेल तर थोडाफार फरक पडतो.
  •    महिला ठाणेदार असेल तर गुन्हेगारांमध्ये धास्ती नसते हा गैरसमज आहे. याउलट महिला ठाणेदारासमोर हजर झालेल्या गुन्हेगारांमध्ये धास्ती असते.
  •   सामान्य नागरिक, महिला, तरुणींमध्ये पोलीस अधिकाऱ्यांप्रती विश्वासाचे नाते तयार होते. त्यामुळे बरेचदा ठरवून काही अघटित घडणार असेल तर आधीच माहिती मिळते.

सर्वच महिला अधिकाऱ्यांचा संदेश

शिक्षण घेताना मनात ध्येय ठरवा. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश मिळते हे कायम लक्षात ठेवा. महिला आणि पुरुष असा भेदभाव करण्याची संधी समोरच्याला देऊ नका. आपल्या कामाप्रती प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष रहा, असे आवाहन महिला दिनानिमित्त ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट देणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केले.

संकलन   –  * चंद्रशेखर बोबडे  * राम भाकरे   *  राजेश्वर ठाकरे   *  अनिल कांबळे   *  राखी चव्हाण

छायाचित्र  –  *  धनंजय खेडकर