नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयाचे काम सुरू आहे. परंतु ते केव्हा पूर्ण होऊन सुरू होणार? याबाबत अद्यापही कुणी सांगू शकत नाही. त्यातच मेडिकल रुग्णालयात अद्याप ‘लिनिअर एक्सिलेटर’ यंत्र पोहचले नाही. या यंत्राची खरेदी वर्षानुवर्षे लांबल्याने या यंत्राचा खर्च दुप्पट झाला असून त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मुखाचे कर्करुग्ण सर्वाधिक आढळणाऱ्या भागात नागपूरचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. त्याला तंबाखू, गुटखा, पान मसाल्याचे सेवन हे महत्त्वाचे कारण आहे. येथे स्तनाचा कर्करोग व इतरही कर्करुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. नागपुरात बहुप्रतिक्षित कॅन्सर इन्स्टिट्यूट १८ महिन्यात उभारण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश होते. सन २०१९ मध्ये मुदत संपल्यावरही ते झाले नाही. त्यानंतर न्यायालयाच्या दबावात आता या इन्स्टिट्यूटचे काम सुरू आहे.
दरम्यान, शासनाने मेडिकलच्या कर्करोग विभागाला ‘लिनिअर एक्सिलेटर’साठी २३.२० कोटी रुपयांचा निधी दिला होता. हा निधी यंत्र खरेदीसाठी मेडिकलकडून हाफकीन संस्थेकडे वर्गही झाला होता. परंतु, हाफकीनला यंत्र खरेदी करता आली नसल्याने हा निधी सरकारला परत केला गेला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्याने तातडीने हा निधी परत मिळाला. फेब्रुवारी २०२४ दरम्यान पुन्हा निविदा प्रक्रिया झाली. यावेळी मेडिकलकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संबंधित समितीकडे यंत्रात आवश्यक सोयीबाबतचे सादरीकरणही झाले. त्यानंतर दोन कंपन्यांनी यंत्र देण्याबाबत रस दाखवला. परंतु, त्यानंतर तांत्रिक कारणाने अद्यापही पुढील प्रक्रिया झाली नाही.
या यंत्राची देणी डॉलरमध्ये देण्यावरून कंपनी अडून बसली होती. त्यामुळे हे यंत्र रखडले आहे. आता यंत्र येण्याचे संकेत आहे. परंतु, नवीन यंत्र, त्याची सुमारे १० वर्षे देखभाल व दुरुस्तीसह इतर खर्च पकडून आता या यंत्राची किंमत सुमारे ४५ कोटी रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत यंत्र खरेदीत दिरंगाईमुळे यंत्राची किंमत सुमारे दुप्पट झाली आहे. या वृत्ताला वैद्यकीय शिक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.
कालबाह्य कोबाल्टवर उपचार
आजच्या स्थितीत जगभरात कर्करुग्णांवर आधुनिक ‘लिनिअर एक्सिलेटर’वर उपचार होत असले तरी नागपुरातील मेडिकलमध्ये हे यंत्र नसल्याने येथील रुग्णांना कालबाह्य कोबाल्ट यंत्रावर उपचार दिले जात आहे. मेडिकलमध्ये सध्या दिवसाला ६० ते ७० रुग्णांवर असे उपचार होतात, हे विशेष.