अकोला : वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराची तीन वर्षीय चिमुकली खेळतांना पडक्या विहिरीत कोसळली. संत गाडगे बाबा आपत्कालीन बचाव पथकाने विहिरीत उडी घेऊन चिमुकलीचा शोध घेतला. मात्र, त्या चिमुकलीचा मृतदेहच हाती लागला. ही हृदयद्रावक घटना वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यात २ फेब्रुवारीला घडली. सुंदरी धनसिंग सिसोदिया (तीन वर्ष, रा.झिर पांजरिया ता.नेपानगर जि. बुऱ्हाणपूर) असे मृत मुलीचे नाव आहे.
मंगरुळपीर ते वाशीम मार्गावर वीज केंद्राजवळील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराची मुलगी परिसरात खेळत होती. यावेळी वीटभट्टी जवळील विहिरीत ती चिमुकली अचानक पडली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनद्वारे संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन पाचारण केले.
दीपक सदाफळे यांनी गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल, अपूर्व चेके, लखन खोडे, शुभम भोपळे, शिवा अडात, सिद्ध इंगोले यांच्यासह घटनास्थळावर धाव घेतली. विहीर ही कच्ची आणि पडकी होती. पथकाने जीवाची पर्वा न कराता मोठ्या धाडसाने शोध मोहीम सुरू केली. एका तासातच विहिरीतील चिमुकलीचा मृतदेह शोधून बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. यावेळी स.पो.नि.संतोष कोहर, नारायण लोणकर, इतर पोलीस कर्मचारी, वीटभट्टी कामगार, त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विहिरीत पडून चिमुकल्या मुलीचा जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीचा खेळतांना विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाल्याने वीटभट्टी कामगाराच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेने समाजमन सुन्न झाले.
सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर
प्रत्येकाच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी मजबूत वीट निर्मितीत आपले आयुष्य खर्ची घालणारे वीटभट्टी कामगार तप्त उन्हात राबत असतात. कामाच्या ठिकाणी सुविधांची वानवा आहे. शासनाच्या योजना त्यांच्यापासून कोसो दूरच आहेत. स्थलांतरित वीटभट्टी कामगार अनेक समस्यांच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. बहुतांश वीटभट्ट्यांवर स्थलांतरित कामगार असतात. या वीटभट्टी कामगारांकडे सातत्याने दुर्लक्ष होते. वीटभट्टीवर काम करण्यासाठी कुटुंबच स्थनांतरित होत असल्याने त्यांची फरपट होते. विदर्भात वीटभट्टी कामगारांचे प्रश्न अधिकच गंभीर स्वरूपाचे असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

