अस्थिरोग तज्ज्ञांचे निरीक्षण; उद्या जागतिक ‘स्पाईन दिन’

नागपूर : करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी अलीकडे बऱ्याच कंपन्यांकडून घरातून काम करण्याची सुविधा देण्यात आली. परंतु, यामुळे  कधीच व्यायाम न करणाऱ्यामध्ये मानेचे व कंबरेचे दुखणे वाढत असल्याचे निरीक्षण शहरातील अस्थिरोग, मेंदूरोगसह इतरही शाखेतील तज्ज्ञ डॉक्टर नोंदवत आहेत. यापैकी काहींना स्पॉन्डिलायटिसचेही निदान होत असल्याचे डॉक्टर सांगतात. १६ ऑक्टोबरला जागतिक स्पाईन दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

लठ्ठपणा, पाठीचे कमकुवत स्नायू, हाडांची कमजोरी, दुचाकी व चारचाकीतून प्रवासादरम्यान रस्त्यावरील खड्डे व गतिरोधकावरून वेगाने प्रवास, जड गोष्टी वाकून उचलण्याने मान व कंबरेचे स्पॉन्डिलायटिस वाढते. या व्याधींवर नियंत्रण मिळवायचे असेल तर नियमित व्यायामासह एकाच पद्धतीने जास्त वेळ न बसता, पाठ सरळ ठेवून काम करणे आणि कामादरम्यान पाठीचे, मानेचे व्यायाम करणे आवश्यक आहे. बऱ्याच दिवसांपासून मान व कंबरेचे दुखणे व हातापायाला मुंग्या, पाय जड होणे अथवा जलद गतीने चालताना त्रास होणे, चक्कर येणे अशी लक्षणेही स्पॉन्डिलायटिसची असू शकतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. हा आजार व्यायामासह औषधांनीही नियंत्रित होतो. सोबतच मध्यम व कमी उत्पन्न गटातील लोकांमध्ये पाठीच्या कण्याचा क्षयरोगही आढळतो. तोही औषधांनी बरा होऊ शकतो. जास्त त्रास असलेल्या स्पॉन्डिलायटिसच्या रुग्णांवर वेळेवर शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाला आराम मिळू शकतो. याशिवाय  उंचावरून पडल्याने वा अपघाताने मान व पाठीच्या कण्याला इजा होऊ  शकते. सोबतच कॅल्शियमची उणीव निर्माण झाल्याने  ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडांची ठिसूळता वाढते व त्यामुळे पाठीचा कणा मोडण्याची शक्यता अधिक वाढते,  असेही क्रिम्स रुग्णालयातील मेंदूरोग शल्यचिकित्सक डॉ. अक्षय पाटील यांनी सांगितले.