नागपूर : ‘रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया’ या संस्थेच्यावतीने नागपूरसह देशभरात १० लाख ६४ हजार ९८९ नागरिकांची नि:शुल्क मधुमेह तपासणी करण्यात आली. त्यापैकी अचूक नोंदणी असलेल्या २ लाख २५ हजार ९५५ जणांच्या नमुन्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला. त्यात ३५ वर्षांखालील १७.९ टक्के युवकांना मधुमेहाची जोखीम असल्याचे पुढे आले. हे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय जर्नल’मध्येही प्रकाशित झाले आहे.
मधुमेह तज्ज्ञांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया’तर्फे ३५ वर्षांखालील भारतीय युवकांमध्ये मधुमेहाचा प्रसार किती? हे बघण्यासाठी २९ सप्टेंबर २०२१ मध्ये एकाच वेळी देशभरातील १० हजार २५८ केंद्रांमध्ये मधुमेह तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यात नागपुरातील ७५ केंद्रांचा समावेश होता. तपासणीत भारतात ३५ वर्षांपेक्षा खालील १८ टक्के नागरिकांना मधुमेहाचे निदान झाल्याचे आढळले.
निरीक्षणात २५ वर्षांखालील वयोगटात ९.८ टक्के, ३० वर्षांखालील वयोगटात १३.३ टक्के, ३५ वर्षांखालील गटात १७.९ टक्के युवकांमध्ये मधुमेह असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाढत्या वयानुसार मधुमेहाचे रुग्णही वाढताना दिसत असल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले. स्थूलपणा आणि स्थिर जीवनशैली असलेल्यांमध्ये मधुमेहाची जोखीम अधिक असल्याचे आढळून आले. या अभ्यासात देशातील नावाजलेले मधुमेह तज्ज्ञ बंसी शाहू, राकेश पारेख, संजय अग्रवाल, व्ही. मोहन, अमित गुप्ता आणि संघटनेच्या सगळ्याच सदस्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
मधुमेहाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात प्रमाण अधिक
मधुमेहाची पार्श्वभूमी असलेल्या कौटुंबिक इतिहास (आई व वडील अथवा आई किंवा वडिलांपैकी एकाला मधुमेह असणे) असलेल्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आढळले. त्यात ३५ वर्षांखालील ४०.१ टक्के, ३० वर्षांखालील ३१.८ टक्के, २५ वर्षांखालील २६.४ टक्के नागरिकांत मधुमेह आढळला. तर मधुमेहाची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबापैकी ३५ वर्षांखालील ६ टक्के, ३० वर्षांखालील ४.७ टक्के, २५ वर्षांखालील ३.५ टक्के नागरिकांमध्ये मधुमेह आढळला. ज्यांच्या कुटुंबात मधुमेहाची पार्श्वभूमी आहे त्यांच्यात या आजाराचा धोका ३-४ पट अधिक असल्याचे पुढे आले.
देशभरात एकाच दिवशी झालेल्या मधुमेह तपासणीच्या अभ्यासात ४२ टक्के पुरुष तर ३७ टक्के महिलांमध्ये मधुमेहाचे निदान झाले. पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक दिसत आहे. परंतु, काही भागात हे प्रमाण समान आढळले. वाढत्या वयानुसार मधुमेहाचे रुग्ण वाढताना दिसतात. पश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारतात १० वर्षे आधी हा आजार आढळत असल्याने त्याकडे शासनासह नागरिकांनीही गांभीर्याने बघण्याची गरज आहे. जीवनशैलीत बदल, रोज व्यायामासह आवश्यक काळजी घेतल्यास हा आजार टाळणे शक्य आहे. – डाॅ. सुनील गुप्ता, नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष , रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया.
