scorecardresearch

भारतात ‘आयबीडी’चे १२ लाख रुग्ण

हा आजार जास्त प्रमाणात २० ते ५० वयोगटातील नागरिकांत आढळतो.

भारतात ‘आयबीडी’चे १२ लाख रुग्ण

जागतिक ‘आयबीडी’ दिन आज

भारतात आतडय़ांशी संबंधित असलेल्या ‘इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज’ (आयबीडी)चे रुग्ण वाढत आहेत. जगात आढळणाऱ्या सुमारे ५० लाखांपैकी १२ लाखांच्या जवळपास रुग्ण हे भारतातील आहेत. या आजारामुळे तोंडापासून गुदद्वारापर्यंतच्या पचनयंत्रणेच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो. १९ मे रोजी जागतिक ‘आयबीडी दिन’ आहे.

सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टरॉलॉजिस्ट डॉ. प्रशांत भांडारकर यांनी सांगितले की, आयबीडी आजाराचे क्रोन्स आजार आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस असे दोन प्रकार आढळतात. हा आजार आतडय़ांच्या बाह्य़ आवरणाला आलेल्या सुजेमुळे होतो. त्यामुळेच आतडय़ांमध्ये अडथळ्यांसह इतर अनेक त्रास आढळून येतात. क्रोन्स आजार आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस (यूसी) हे काही प्रमाणात एकसारखे आहेत, परंतु ते पचनयंत्रणेच्या विविध भागांवर परिणाम करतात. क्रोन्सच्या आजारामुळे तोंडापासून गुदद्वारापर्यंत पचनयंत्रणेच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो, तर अल्सरेटिव्ह कोलायटीस हा केवळ गुदमार्ग आणि कोलोन यांच्यावर परिणाम करतो.

हा आजार जास्त प्रमाणात २० ते ५० वयोगटातील नागरिकांत आढळतो. या आजाराने रुग्णाची स्थिती ढासळत असून त्यावर योग्य औषधोपचार, आहार वा शस्त्रक्रियेच्या व्यवस्थापनाने नियंत्रण करणे शक्य आहे. या आजाराचे कारण अद्याप पुढे आले नाही. अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या रुग्णांमध्ये त्वचा, डोळे, हाडे आणि सांधे अशा इतर अवयवांवर परिणाम करणारी लक्षणे दिसू शकतात. अनेकदा ‘आयबीडी’मुळे फिश्टुला, आतडय़ातील अडथळे, शौचात बदल, कोलोन कर्करोग असे गंभीर आजार होऊ शकतात. भारतात २ ते ३ टक्के अल्सरेटिव्हचे रुग्ण असून त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्याला हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. या आजारावर जनजागृती महत्त्वाची असून वेळीच त्याचे निदान करून उपचार घेतल्यास त्रास टाळता येतो.

लक्षणे

  • पोटदुखी
  • शौचाच्या सवयींमध्ये बदल
  • बद्धकोष्ठ
  • वजन घटणे
  • प्रचंड थकवा
  • मळमळ आणि ताप
  • डायरियामध्ये शौचात रक्त जाणे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-05-2016 at 03:13 IST

संबंधित बातम्या