World Thalassemia Day : नागपूर : उपचार आणि वैद्यकीय सुविधांमुळे थॅलेसेमिया रुग्णांचे आयुर्मान वाढत असले तरी प्रौढ अवस्थेत प्रवेश करताना त्यांच्यासमोर नवी आव्हाने उभी राहत आहेत. या अवस्थेत या रुग्णांपैकी अनेकांना वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो, असे निरीक्षण तज्ज्ञ डाॅक्टरांनी नोंदवले आहे. ८ मे रोजीच्या जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त घेतलेला हा आढावा.
बाळाच्या जन्मानंतर साधारण चार ते पाच महिन्यांत थॅलेसेमियाचे निदान होते. त्यानंतर संबंधित बालकाच्या उपचारांची जबाबदारी पालकांवर येते. थॅलेसेमियाग्रस्त मुलांवर उपचार करणारे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विंकी रुघवानी म्हणाले, लहान वयात सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील बालरुग्ण विभागात रुग्णांची काळजी कुटुंबीय आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमितपणे घेतली जाते. रक्त संक्रमण, औषधोपचार आणि आवश्यक तपासण्यांवर सातत्याने लक्ष ठेवले जाते. पूर्वी थॅलेसेमियाग्रस्त मुले १४ ते १५ वर्षांपर्यंतच जगत होती. मात्र, उपचार पद्धतीत सुधारणा झाल्याने आता अनेक रुग्ण ३० वर्षांहून अधिक काळ जगत आहेत. दरम्यान, या विषयात तज्ज्ञ डाॅक्टर हे मुलांशी संबंधित अधिक आहे.
आयुर्मान वाढले असले तरी प्रौढ रुग्णांसाठी आवश्यक सुविधा आणि स्वतंत्र उपचार व्यवस्था अद्याप मर्यादित असल्याचे चित्र आहे. जरीपटका येथील डाॅ. रुघवानी यांच्या रुग्णालयातील थॅलेसेमिया आणि सिकल सेल डे केअर केंद्रात अनेक रुग्ण प्रौढ झाल्यानंतरही उपचारासाठी येतात. दरम्यान डॉ. रुघवानी म्हणाले, “मोठे झाल्यानंतर रुग्णांना इतरत्र उपचार घेण्यास सांगितल्यास उपचारात खंड पडू शकतो. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रौढ वयात प्रवेश केल्यानंतर अनेक रुग्ण विविध कामात गुंतण्यासह इतर कारणांनी नियमित तपासण्या टाळतात, उपचारांमध्ये सातत्य राहत नाही तसेच गुंतागुंतीच्या आजारांवर उशिरा उपचार घेतले जातात. बालरुग्ण विभागातून प्रौढ आरोग्य व्यवस्थेत रुग्णांना नेण्यासाठी ठोस संक्रमण व्यवस्था नसल्याने अनेक जण उपचार प्रक्रियेपासून दूर जात असल्याचेही डाॅ. रुघवानी यांनी नमूद केले.
शैक्षणिक संस्था आणि नियोक्ते संवेदनशील हवेत : डॉ. रुघवानी
शिक्षण, नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळताना तरुण थॅलेसेमिया रुग्णांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, समाजात थॅलेसेमियाबाबत जागरूकतेचा अभाव असल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी तसेच सामाजिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी बालरुग्ण आणि प्रौढ आरोग्य विभागांमध्ये समन्वय वाढवणे, रुग्णांसाठी स्वतंत्र संक्रमण कार्यक्रम राबवणे आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक संस्था आणि नियोक्त्यांनीही थॅलेसेमियाग्रस्त तरुणांबाबत संवेदनशील भूमिका घेण्याची गरज आहे. थॅलेसेमिया रुग्णांचे आयुर्मान वाढवणे महत्त्वाचे असले तरी त्यांना स्वावलंबी आणि सक्षम प्रौढ आयुष्याकडे सुरळीतपणे नेणे तितकेच आवश्यक असल्याचेही डाॅ. रुघवानी यांनी सांगितले.
