नागपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठात मागील आठवड्यात झालेला राष्ट्रीय परिसंवाद वादग्रस्त ठरला. नागपूरचे लेखक आणि कथाकार मनोज रूपडा यांनी कुलगुरू प्राे. आलोक कुमार चक्रवाल यांना अवांतर न बोलता मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करण्याची विनंती केली. यावर कुलगुरू चांगलेच संतापले आणि त्यांनी लेखकाचा सूर अयोग्य असल्याचे सांगत रूपडा यांना चक्क व्यासपीठावरून निघून जाण्यास सांगितले. रूपडा यांच्यासह अन्य साहित्यिकांनीही कार्यक्रमाचा निषेध केला.
साहित्य अकादमी, नवी दिल्ली आणि गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठातील हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘समकालीन हिंदी कथाकथन : बदलत्या जीवनाचे संदर्भ’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सत्रादरम्यान कुलगुरू प्रो. चक्रवाल यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांच्या जीवनातील अनुभव सांगितले. तुम्हाला माझ्या भाषणाचा कंटाळा तर येत नाही ना?, असा प्रश्न त्यांनी रूपडा यांना विचारला. यावर रूपडा यांनी कुलगुरूंना अवांतर न बोलता मुख्य विषयावर भाषण द्यावे, अशी विनंती केली.
यावरून कुलगुरू संतापले व त्यांनी रूपडा यांना व्यासपीठावरून निघून जाण्यास सांगितले. कुलगुरूंच्या या व्यवहाराचा निषेध करत रूपडा आणि इतर काही साहित्यिक सभागृहातून बाहेर पडले. कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय विद्यापीठात हा विषय चर्चेत आला आहे. या घटनेवर शैक्षणिक आणि साहित्यिक वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.
काय म्हणाले कुलगुरू?
रूपडा यांच्या विनंतीनंतर कुलगुरू चक्रवाल म्हणाले, तुम्ही एक उत्तम कथाकार आणि अभ्यासक आहात, असे दिसते. मी मुद्याकडेच येत आहे. मी विषयाबाहेर काहीही बोलत नाही. पण, कदाचित तुमच्यात कुलगुरूंशी बोलण्याची बुद्धी नाही. तुम्हाला कोणी आमंत्रित केले? यांना पुन्हा आमंत्रित करू नका. मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे की, कोणाशी कसे बोलावे याचा शिष्टाचार रूपडा यांना नाही. रूपडा यांना आत्ताच येथून निघून जाण्यास सांगा. त्यांचे येथे स्वागत नाही. तुम्ही जाऊ शकता.
मनोज रूपडा कोण आहेत?
मनोज रूपडा हे एक हिंदी कथाकार आहेत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मागासलेल्या लोकांची स्वप्ने, संघर्ष आणि दुःख त्यांच्या लेखनात मांडले. ‘दफन और अन्य कहानियां’, ‘साज-नासाज’ व ‘टावर ऑफ लाइसेंस’ हे तीन कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.
कुलगुरूंसारख्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने मूळ विषय सोडून स्वत:च्या जीवनावर भाषण देण्याची गरज नव्हती. त्यांनी मूळ विषयावर लक्ष केंद्रित करावे, अशी विनंती केली. मात्र, त्यांनी संतापून व्यासपीठावरून निघून जाण्यास सांगितले. ही कृती एका कुलगुरूंना शोभण्यासारखी नाही. या घटनेचा निषेध म्हणून माझ्यासह महेश कटारे, जया जादवानी आणि अन्य साहित्यिकांनीही कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. -मनोज रूपडा, हिंदी साहित्यिक.
