अमरावती : अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याच्या प्रकरणात अचलपूर येथील आरोपी अयान अहमद याच्या घरावर आज ‘बुलडोजर’ कारवाई करण्यात आली. अशाच प्रकारची कारवाई नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात सरकार का करीत नाही, त्याचे घर बुलडोजरने का पाडत नाही, असा सवाल काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

आरोपींवर कठोर कारवाई करा

परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, असे यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या, ज्या पद्धतीने अचलपुरात आरोपीच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आली, त्याच प्रकारे अशोक खरात याचेही घर तोडले पाहिजे. त्याची पत्नी कित्येक दिवसांपासून फरार आहे, तिला हुडकून काढून तुरूंगात टाकले पाहिजे. या प्रकरणातील एजंट लोकांवरही कारवाई झाली पाहिजे. खरात कुणाकुणाच्या घरात गेला, हेही शोधले पाहिजे.

पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

आज आमदार भाई जगताप, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली. परतवाडामधील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. केवळ मुख्य आरोपीच नाही, तर या गुन्ह्यात त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करावा, अन्यथा काँग्रेसतर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उपस्थित नेत्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज

राज्यात गृहमंत्रालयाचा धाक उरलेला नाही. मुलींचे आणि महिलांचे व्हिडिओ सर्रास प्रसारीत होत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. सायबर विभाग नेमके काय करीत आहे, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. त्या म्हणाल्या, पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे क्लेशदायक आणि संतापजनक आहेत. कुठल्याही घटनेला धार्मिक रंग देण्यापेक्षा गृह मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष देऊन काम करावे. या सर्व प्रकरणांचा तपास तातडीने होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.