अमरावती : जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या येत्या सहा महिन्यांत भाजपमध्ये दिसतील, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असा दावा युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यावर यशोमती ठाकूर यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या दोन नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष आता टिपेला पोहचला आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, आमचे भाऊ रवी राणा यांना विनोद करण्याची सवय आहे. अफवा, गोंधळ, नाटक, नौटंकी सगळ्या गोष्टी करायची सवय त्यांना आहे. तुमचा पक्ष नेमका कोणता हे रवी राणांनी आधी ठरवला पाहिजे. आजची वस्तुस्थिती ही आहे की, भाजपने त्यांचा पक्ष हा नवनीत राणा, रवी राणा यांच्या खुंट्याला बांधला आहे.

आता उरला माझा विषय. मी इथेच जन्मली आणि इथेच मरणार आहे. सत्य काय आहे, ते लोकांना माहीत आहे. तुम्ही जी गुंडगिरी, दादागिरी करताहेत, हे लोकांना अजिबात आवडत नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अख्खा अमरावतीचा भाजप राणा दाम्पत्याच्या स्वाधीन केला आहे. रवी राणांनी म्हटले की, काळ्या दगडावरची पांढरी रेष. मी रवी राणांना म्हणते पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की, जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल, तेव्हा भाजप तुम्हालाच फेकून देणार आहे.

यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिवसा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. निवडणुकीपूर्वी त्यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, असा दावा राणा यांनी केला आहे. तिवसा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते.

पण तेव्हा राजेश वानखडेंना तिकीट द्यायचे निश्चित झाले होते. म्हणून त्याचा भाजप प्रवेश झाला नाही, पण येत्या सहा महिन्यांमध्ये यशोमती ठाकूर या भाजपमध्ये दिसतील, असे वक्तव्य रवी राणा यांनी दिल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी त्यावर तत्काळ प्रत्युत्तर दिले.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला असताना राजकीय वातावरण तप्त झाले आहे. हा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.