यवतमाळ : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हटलं की, डोळ्यांसमोर चित्र उभे राहते ते म्हणजे शाळाबाह्य कामात व्यस्त असलेले शिक्षक आणि पायाभूत सुविधांचा अभाव. परंतु, या नकारात्मकतेला छेद देत यवतमाळ जिल्ह्याने प्राथमिक शिक्षणात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. मुंबईस्थित ‘सीखे’ ही एनजीओ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) आणि प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या यशस्वी समन्वयामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे.
नुकताच जिल्ह्यात १० फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत ‘सीखें इंडिया उत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमातून प्रगत प्राथमिक शिक्षणाचे एक विलक्षण आणि आश्वासक चित्र समोर आले आहे.
नाविन्यपूर्ण अध्यापनातून विद्यार्थ्यांची प्रगती
‘सीखे’ संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात ‘टीआयपी’ (टीचर इनोव्हेटर प्रोग्राम) हा विशेष उपक्रम राबविला जातो. याअंतर्गत शिक्षकांना केवळ प्रशिक्षणच दिले जात नाही, तर भाषा आणि गणित यांसारख्या विषयांत ‘दृश्यमान अध्ययन’ कसे साध्य करता येईल, याचे तंत्र शिकवले जाते. शिक्षकांनी वर्षभर वर्गात जे नाविन्यपूर्ण प्रयोग केले, त्याचे फलित म्हणजे हा ‘सीखें इंडिया उत्सव’ होय. बाभुळगाव, कळंब, नेर आणि यवतमाळ या चार तालुक्यांमधील २५५ शाळांमधील तब्बल ८ हजार ७११ विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने भाषा आणि गणितातील कठीण संकल्पनांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना शिकलेली गोष्ट ‘दृश्यमान’ स्वरूपात मांडता येणे हा आहे. स्वतःची गोष्ट तयार करणे, ती सांगणे आणि गणितासारख्या क्लिष्ट विषयाशी मैत्री करणे, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन महत्वाचे ठरले.
पालक आणि शाळांमधील दुवा
या प्रदर्शनाचे सर्वात मोठे यश म्हणजे पालकांचा सहभाग. सादरीकरणाच्या वेळी सुमारे ४ हजार ६३ पालक आणि शिक्षणप्रेमींनी शाळांना भेटी दिल्या. इयत्ता पहिली ते पाचवीच्या चिमुकल्यांनी जेव्हा गणित सोडवण्याच्या सोप्या पद्धती आणि भाषिक खेळ आपल्या ओघवत्या भाषेत मांडले, तेव्हा पालक थक्क झाले. यामुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास तर वाढलाच, पण शाळा आणि समाज यांच्यातील दुवा अधिक घट्ट झाला आहे.
विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव
या उपक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सीखेंचे मुंबईतील डॉ. शरदचंद्र पाटील, अर्चना शिंदे, शुभांगी पुरंदरे आदी मंडळींनी यवतमाळात अनेक प्रदर्शनात सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक पातळीवर मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थीसुद्धा शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेच मागे राहू नयेत, त्यांचे गणितीय आणि भाषिक कौशल्य विकसित होऊन, अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून सादरीकरणाचा आत्मविश्वास वाढून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सीखे संस्थेचे प्रयत्न सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
