यवतमाळ : सोमवारी सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी होत असताना जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात चुरमुरा येथे अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी झाडावर वीज कोसळली. यात झाडाखाली बकऱ्यांचा कळप आडोशाला थांबला होता. या कळपावर वीज कोसळून २१ बकऱ्या जागीच ठार झाल्या. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे सोमवारी सायंकाळी अचानक सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला. यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचावासाठी काही बकऱ्या मोहाच्या झाडाखाली आडोशाला गेल्या. नेमकी त्याच वेळी झाडावर वीज पडून २१ बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. यात १७ बकऱ्या आणि ४ बोकडांचा समावेश आहे. चुरमुरा गावातील बंजारा तांडा येथील समाधान फुलसिंग राठोड हा मेंढपाळ गावातील जवळपास ८० बकऱ्या घेऊन चरण्यासाठी जंगलात गेला होता. दुपारी कडक ऊन असताना अचानक ढग दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.

हेही वाचा – चंद्रपूर : धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने केली मारहाण

मेंढपाळ राठोड याने लगतच्या मोहाच्या झाडाखाली बकऱ्या नेल्या. तो इतर बकऱ्या गोळा करत असताना झाडावर अचानक वीज कोसळली. यात २१ बकऱ्या जागीच ठार झाल्या. यामध्ये चुरमुरा येथील जवळपास १७ शेतकऱ्यांच्या बकऱ्या मृत झाल्या. त्यामुळे मोलमजुरी करून बकऱ्या घेऊन संगोपन करणाऱ्या व पोटाची खळगी भरणाऱ्या या शेळी मालकांवर मोठे संकट ओढवले आहे. बकरी ईदच्या दिवशी आलेल्या संकटाने हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने या घटनेत मनुष्यहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच उमरखेड येथील तहसीलदार राजू सुरडकर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभारे यांच्या समवेत घटनास्थळाला भेट दिली व तत्काळ मृत झालेल्या सर्व बकरी व बोकडांचे शवविच्छेदन जागीच करण्यात आले. या घटनेने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता सरकारकडून नैसर्गिक आपत्तीची मदत मिळावी, अशी मागणी शेळी पालकांनी केली आहे. सध्या जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने ओढ दिली आहे. मात्र काही भागात पाऊस विस्कळीतपणाने कोसळत आहे. त्यातच विजांचा कडकडाट राहत असल्याने या वादळी पावसाची नागरिकांना धडकी भरली आहे. वीज कोसळून दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहे.

हेही वाचा – अकोला : कार्यकर्त्याने चक्क नाना पटोले यांचे पाय धुतले, नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

वीज कोसळून शेतकरी ठार

पुसद तालुक्यातील जनुना शिवारात अंगावर वीज कासळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. संतोष नारायण वाळसे (४५) हे मृताचे नाव आहे. नातवाईक व ग्रामस्थांनी त्यांना पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, वडील, भाऊ आहे.