यवतमाळ : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यात बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेला जोमाने सुरुवात झाली आहे. रोजमजुरीसाठी गाव, जिल्हा सोडण्याआधी घरातील मुलीचे हात पिवळे करून, जबाबदारीतून मुक्त व्हायचे या भावनेतून ग्रामीण भागात होणारे चार बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेने टळले. बोहल्यावर चढता चढता चाईल्ड हेल्पलाईन १०९८ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाने हे बालविवाह रोखले.

यवतमाळ शहरानजीक वाघाडी, नेर तालुक्यातील रत्नापूर बेडा, बाभूळगाव येथील गणोरी आणि महागाव तालुक्यातील पिंपळगाव इजारा या चार गावांमध्ये अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिले जाणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईनला मिळाली होती. लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात असताना आणि पाहुण्यांची वर्दळ सुरू असतानाच, सतर्क नागरिक आणि हेल्पलाईनच्या चमूने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी धाडी टाकल्या. ऐनवेळी प्रशासकीय यंत्रणा दाखल झाल्याने हे नियोजित विवाह थांबवण्यात आले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश हळदे, मनीष शेळके आणि त्यांच्या चमूने हे चारही बालविवाह रोखून ही कारवाई फत्ते केली. केवळ लग्न थांबवून पथक थांबले नाही, तर त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या मदतीने संबंधित चारही मुलींच्या पालकांचे समुपदेशन केले.

समुपदेशनादरम्यान पथकाने पालकांना, मुलीला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याबाबत समजावून सांगितले. तसेच ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६’ नुसार, लग्नासाठी मुलाचे वय किमान २१ आणि मुलीचे वय १८ पूर्ण असणे अनिवार्य आहे. या वयापूर्वी लग्न लावणे हा केवळ सामाजिक गुन्हा नसून, तो गंभीर दखलपात्र गुन्हा आहे, याची जाणीव सर्व मुलींच्या पालकांना करून दिली. अल्पवयीन वयात विवाह आणि गर्भधारणा यामुळे मुलीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊन प्रसंगी मुलीचा जीवही जाण्याचा धोका असतो, हेही पटवून दिले.

या कारवाईनंतरही अनेक पालकांनी लग्न थांबविण्यास विरोध केला. त्यांना कायद्याचा धाक दाखवताच मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लग्न करून देऊ, अशी ग्वाही पालक आणि नातेवाईकांनी दिली. मात्र पुन्हा याप्रकारे बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न झाला तर संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रशासनाने सर्व पालकांना दिला.

वर्षभरात बालविवाहाच्या ६० तक्रारी

यवतमाळ जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे २०२५ च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या वर्षभरात आतापर्यंत ६० पेक्षा अधिक बालविवाहांबाबत तक्रारी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही आकडेवारी समोर आलेली असली तरी पडद्यामागे होणाऱ्या बालविवाहाची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.