यवतमाळ : केंद्र व राज्य सरकारच्या सुमारे ३०२ कोटी रुपयांच्या अमृत योजनेचा यवतमाळ शहरात अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. आजही शहरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, प्रभाग क्रमांक २१ मध्ये शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय उपगनलावार यांनी या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात उतरून अनोखे आंदोलन केले.
या आंदोलनात परिसरातील नागरिकांनीही सहभाग घेत आपला संताप व्यक्त केला.जीवन प्राधिकरणाने युद्धपातळीवर काम करून अमृत योजनेची कामे पूर्ण करावीत, यासाठी लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना दिल्या. तसेच नागरिकांनीही अनेकदा आंदोलनाचा मार्ग अवलंबला; मात्र तरीही ही योजना पूर्णत्वास गेलेली नाही.
परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
सन २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेली अमृत योजना अद्याप रखडलेलीच आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील नाराजी आणि संताप आज उफाळून आला. दाते कॉलेज रोड परिसरात भूमिगत गटार योजनेसाठी कंत्राटदाराने मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. जेसीबीच्या कामादरम्यान अनेक पाईपलाईन फुटल्याने शास्त्रीनगर, दहीवलकर प्लॉट, शिवाजीनगर तसेच दाते कॉलेज परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. आधीच सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना अशा अडचणी निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहे.
खोदलेला खड्डा अत्यंत मोठा असल्याने रस्ताही बंद झाला असून नागरिकांना वळसा घालून आपल्या घरी जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने शिवसेनेचे पदाधिकारी संजय उपगनलावार यांनी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उमप यांनी दोन दिवसांत संबंधित ठिकाणचे काम पूर्ण करून खड्डा बुजविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
दोन दिवसांत खड्डा बुजवून काम पूर्ण करण्यात यावे तसेच फुटलेल्या पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागण्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान मांडण्यात आल्या आहेत. खड्ड्यात पडून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्या अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय उपगनलावार यांनी दिला आहे. दरम्यान यवतमाळ शहरवासीय सध्या अमृत योजना आणि भूमिगत गटार योजनेमुळे प्रचंड त्रस्त असून, धुळीमुळे श्वसनाचे आजार आणि खराब रस्त्यांमुळे मणक्यांच्या आजारामुळे बेजार झाले आहेत.
