यवतमाळ : लहान मुलांची जेवणातील नखरे, गरोदर महिला व स्तनदा मातांची पोषणाची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील ‘घरपोच पोषण आहार’ योजनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ पासून अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींच्या ताटात अधिक चवदार आणि पौष्टिक आहार पाहायला मिळणार आहे.

काय आहेत पोषण आहारातील नवे बदल?

आहार अधिक रुचकर आणि स्वीकारार्ह व्हावा, यासाठी महिला व बालविकास विभागाने पाककृतींमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. पूर्वी दिल्या जाणाऱ्या पौष्टिक तूरडाळ खिचडी प्रीमिक्स ऐवजी आता स्वादिष्ट ‘व्हेज पुलाव’ उपलब्ध करून दिला जाईल. मुलांची आवडती ‘पौष्टिक मूगडाळ खिचडी प्रीमिक्स’ ही पाककृती कायम ठेवण्यात आली आहे; परंतु आता त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाईल, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार चवदार खिचडी बनवता येईल. भरड धान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रणाऐवजी आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा ‘बहुधान्य पौष्टिक पफ’ देण्यात येणार आहे. पौष्टिक बहुधान्य-प्रथिन मिश्रण ही पाककृती पूर्ववत आणि कायम असणार आहे.

बदलांमागील मुख्य उद्देश काय?

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमार्फत हजारो बालके आणि मातांना घरपोच पोषण आहार दिला जातो. मात्र, अनेकदा एकाच प्रकारच्या आहारामुळे तो खाण्याबाबत अनास्था दिसून येत असे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत निर्देशांनुसार, लाभार्थ्यांना केवळ कॅलरीज किंवा पोषण देणे एवढाच उद्देश नसून, तो आहार त्यांनी आवडीने आणि आवडीच्या चवीने खावा, या हेतूने हे सुधारित मेनू तयार करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील लाभार्थ्यांना होणार थेट फायदा

जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये या सुधारित मेन्यूनुसार पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यापासून या नव्या मेनूची अंमलबजावणी प्रत्यक्ष जमिनीवर दिसेल. या नव्या आणि चवदार बदलांमुळे कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळ मिळेलच, शिवाय बालकांचे आरोग्य सुधारण्यास आणि गरोदर व स्तनदा मातांना योग्य पोषण मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास महिला व बालविकास विभागाने व्यक्त केला आहे.