Yavatmal Apsara Theatre Demolished : यवतमाळ : शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू आणि रसिक प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना स्वप्नवत दुनियेची सफर घडवणारी येथील ऐतिहासिक ‘अप्सरा’ चित्रपटगृह अखेर काळाच्या पडद्याआड गेले आहे. या चित्रपटगृहाची वास्तू भुईसपाट करण्यात आली. यासोबतच यवतमाळकरांच्या कित्येक वर्षांच्या आठवणींचा एक समृद्ध कोपरा कायमचा रिता झाला आहे. ‘अप्सरा’ भुईसपाट झाल्यामुळे शहराच्या नकाशावरून आणि यवतमाळकरांच्या मन:पटलावरून ओळखीचा एक मोठा भाग पुसला गेल्याची हुरहूर शहरवासीयांना लागली आहे.

‘राजकमल’ ते ‘अप्सरा’: एक ऐतिहासिक प्रवास

या टॉकीजचा इतिहास अत्यंत रंजक आणि गौरवशाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात १९६७ मध्ये या चित्रपटगृहाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या टॉकीजच्या पडद्यावर मनोज कुमार यांचा ‘उपकार’ हा चित्रपट पहिल्यांदा झळकला. सुरुवातीला हे चित्रपटगृह ‘राजकमल’ या नावाने ओळखले जात असे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याशी या चित्रपटगृहाशी जवळचे नाते होते. पुढे अमरावती येथील शंकरलाल राठी आणि हिरालाल राठी यांनी या चित्रपटगृहाची धुरा सांभाळली. तेव्हा ‘राजकमल’ ‘अप्सरा’ झाली. २००१ मध्ये ‘यादे’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्या काळात जवाहर जाजू यांनी ही टॉकीज विकत घेतली. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट तर सलग काही महिने येथे सुरू होता. येथे तिकीटबारीवर कित्येक वेळा पोलीस बंदोबस्त लावावा लागला. अनेक चित्रपट ‘हाऊसफुल’ चालले.

मैत्री आणि आठवणींचे हक्काचे ठिकाण

यवतमाळकरांसाठी अप्सरा टॉकीज केवळ करमणुकीचे साधन नव्हते, तर ते विविध सामाजिक, राजकीय चर्चेचेही ठिकाण होते. अप्सरा टॉकीजच्या कॅन्टीनमधील लस्सी आणि समोसे, आलुबोंडे खात कित्येक मित्रांच्या टोळ्या इथेच जमल्या. अनेक पिढ्यांचे बालपण इथेच फुलले. तिकीट खिडकीवरची धक्काबुक्की, ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागण्यापूर्वी तिकीट मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी वाजणारी ती घंटा, शिट्ट्या हे सर्व आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. ओटीटीच्या युगात आता मोबाईलवर सिनेमे पाहिले जात असले तरी, पडद्यावर चित्रपट अनुभवण्याची ती मजा आता पुन्हा कधीच अनुभवायला मिळणार नाही.

आता केवळ एकच चित्रपटगृह सुरू

अप्सरा, श्याम, सरोज आणि संदीप या चार टॉकीज यवतमाळरांच्या भावनांशी थेट जुळल्या आहेत. त्यातील जाजू यांच्या मालकीचीश्याम आणि अप्सरा टॉकीज बंद पडली आणि आज अप्सराची वास्तुही पाडली. अन्य एक संदीप टॉकीज मंगल कार्यालय झाले. मल्टीप्लेक्सच्या युगात ‘सरोज’ चित्रपटगृह मात्र आजही तग धरून आहे.

संघर्षाचा काळ आणि मालकांची माणुसकी

बदलत्या काळात जेव्हा चित्रपट व्यवसाय अडचणीत आला होता, तेव्हा चित्रपटगृहाचे संचालक जवाहर जाजू यांनी प्रतिकूल परिस्थितीतही ही टॉकीज सुरू ठेवली. विशेष म्हणजे, सात वर्षांपूर्वी कोरोनाच्या संकटामुळे जेव्हा हे चित्रपटगृह बंद पडले, तेव्हाही या चित्रपटगृहाच्या मालकांनी आपल्या २०-२२ कर्मचाऱ्यांची साथ सोडली नाही. मात्र, काळाच्या ओघात आणि शहराच्या वाढत्या शहरीकरणामुळे अखेर ही वास्तू पाडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगण्यात आले. हे चित्रपटगृह पाडल्या जाणार असल्याचे कळताच, या टॉकीजशी भावनिकरित्या जुळलेल्या अनेकांनी ‘अप्सरा’ला अखेरचे डोळे भरून पाहत ही वास्तू कॅमेराबंद केली. आता येथे लवकरच मोठी व्यवसायिक वास्तू आकारास येण्याची शक्यता आहे.