यवतमाळ : आचार्य विनोबा भावे यांच्या चळवळीतून भूमिहीन, गरीब शेतकऱ्यांच्या चुली पेटवण्यासाठी दान मिळालेल्या जमिनींवर भू-माफिया, बिल्डर लॉबी आणि भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांनी डोळा ठेवून कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकल्याचे भीषण वास्तव उघडकीस आले आहे.

३३ हजार जमीन बेपत्ता

राज्यातील सर्वाधिक भूदान जमीन मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ३३ हजार एकर जमीन बेपत्ता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या महाघोटाळ्याची राज्यातील पाळेमुळे मुळासकट उपटण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करून ‘ए टू झेड’ चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळ येथे केली.

बेकायदेशीर प्लॉट; महसूल बुडाला

या महाघोटाळ्यात शासनाची कोट्यवधी रुपयांची महसूल फसवणूक तर झालीच आहे; शिवाय भूदानाच्या अनधिकृत जमिनींवर बेकायदेशीर प्लॉट पाडून ते सामान्य नागरिकांना विकून हजारो कुटुंबांचीही फसवणूक करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक भूदान जमीन मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यातच या जमिनींचा मोठा अपहार झाला आहे. भूदान यज्ञ मंडळाला जमीन वाटपाचे अधिकार असले तरी अंतिम मंजुरीचे अधिकार सरकारकडेच आहेत, असे सांगत बावनकुळे यांनी या गैरव्यवहारांवर कठोर कारवाईचे संकेत दिले.

भूदान यज्ञ मंडळातील झारीचा शुक्राचार्य कोण?

यवतमाळ जिल्ह्यात भूदानात मिळालेल्या मोक्याच्या जमिनी खासगी व्यक्तींसह बांधकाम विकासकांना बेकायदेशीरपणे विकण्यात आल्या आहेत. महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट नोंदींच्या आधारे हा सर्व खेळ चालवला गेला. भूदानाच्या पवित्र उद्देशाला हरताळ फासणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशारा दिल्याने आता भू-माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या चौकशीत भूदान यज्ञ मंडळातील झारीचा शुक्राचार्य कोण? याचाही शोधा सरकारसह तपास यंत्रणेने घ्यावा, अशी मागणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी केली आहे.

कोकणातील जमिनीचे व्यवहार थांबविले

दरम्यान, या चौकशीसोबतच गोवा व सिंधुदुर्ग सीमेलगतच्या मोपा परिसरात शेतकऱ्यांचे खोटे दाखले दाखवून परप्रांतीय लोक जमिनी खरेदी करत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सर्व खरेदी-विक्री व्यवहार तूर्तास थांबवण्यात आले असून उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.